Chhaya Kadam Kokan Gauri Visarjan Shegla Bhaji Recipe: लोकप्रिय अभिनेत्री छाया कदम या मूळच्या कोकणातील असून सध्या त्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करत आहेत. कोकणातील गणेशोत्सवाची परंपरा हा नेहमीच कुतूहलाचा विषय राहिला आहे. गौरी विसर्जनाच्या दिवशी कोकणामध्ये एका पालेभाजीचा नैवेद्य केला जातो. छाया कदम यांनी स्वतः ही भाजी करण्याची सोपी पद्धत शेअर केली आहे.

सध्या सोशल मीडियावर छाया कदम दररोज गणपतीची पूजा आणि कोकणातील सणाची खासियत शेअर करत असतात. गौरींना निरोप देताना कोकणामध्ये भाकरी-भाजीचा नैवेद्य दाखवला जातो. ही भाजी एक खास पालेभाजी असते, तिचे नाव शेगला. अनेकांना ही भाजी कशी करायची हे माहीत नाही, त्यामुळे कोकणामध्ये आवर्जून केली जाणारी ही भाजी कशा प्रकारे करायची हे छाया कदम यांनी करून दाखवली. यावेळी त्यांनी गुलाबी रंगाची सुंदर अशी साडी नेसली असून त्यासह पारंपरिक मोत्याची नथ स्टाइल केली.

कोकणाती खास शेगला पालेभाजीची रेसिपी

शेगलाची भाजी तयार करताना छाया कदम यांनी सुरूवातीला तेलामध्ये मिरची व कांद्याची फोडणी केली. यावेळी त्यांनी फोडणीमध्ये थोडे खोबरेल तेलसुद्धा घातले. त्या म्हणाल्या, “माझी आई कोणतीही पालेभाजी करताना आणि पिठी करताना त्यात थोडे खोबऱ्याचे तेल घालते, ते मला खूप आवडते.” पुढे त्यांनी कांदा भाजल्यानंतर हळद व चवीनुसार मीठ घातले. यानंतर त्यांनी शेगलाची चिरून व धुवून ठेवलेली भाजी घातली. बारीक गॅसवर भाजी चांगली परतून घेतली आणि झाकण ठेवून शिजवून घेतली.

छाया कदम यांची आई वेगळ्या पद्धतीने करतात पालेभाज्या

पुढे भाजी शिजल्यानंतर छाया कदम यांनी त्यामध्ये खोबऱ्याचा किस घातला. यावेळी त्या म्हणाल्या, “मी जशी फोडणी देऊन भाजी केली, पण माझी वेगळ्या पद्धतीने भाजी करते. आई पूर्ण भाजी, मिरची आणि कांदा हे सर्व एकत्र शिजवून घेते आणि त्यानंतर भाजी आटल्यानंतर त्यामध्ये वरून तेल व खोबरं टाकते. सगळ्या पालेभाज्या याच पद्धतीत करते. पण, मी कशीही भाजी केली तरी तिला आईच्या हाताची चव येत नाही.”

कोकणात गौरी विसर्जनाची आहे खास पद्धत

कोकणातील गौरी विसर्जनाची पद्धत सांगत छाया कदम म्हणाल्या, “गौऱ्या घेऊन जाताना ही शेगलाची भाजी भाकरी घेऊन बावड्यात जायचे असते. बावड्यात खूप मज्जा येते, कारण- पूर्ण वाडीतील सर्व बायका व पुरुष तिथे भेटतात. सगळे आपापल्या घरातून हा भाजी-भाकरीचा नैवेद्य घेऊन येतात. आरती व पूजा वगैरे झाली की सगळे नैवेद्य दाखवतात आणि प्रत्येकाच्या घरातील नैवेद्याचा एक-एक घास खातात. आजच्या दिवशी शेगलाची भाजी खूप चांगली लागते.”