Chhaya Kadam Kokan Tradition home : मराठीमोळी अभिनेत्री छाया कदम यांचे कोकणाशी घट्ट नाते असून, त्यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील धामापूर येथे त्यांचे मूळ गाव आहे. कामाव्यतिरिक्त त्या कोकणामध्ये ते निसर्गाच्या सान्निध्यात सुंदर क्षण घालवतात. सण-उत्सव आणि महत्त्वाच्या सणांना छाया कदम आवर्जून आपल्या कोकणातील घरी जात असतात. आता म्हाळाच्या म्हणजेच श्राद्धकार्याच्या निमित्ताने छाया कदम यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.

नवरात्रोत्सवाच्या पूर्वी पितृ-पंधरवडा असून, त्यानिमित्ताने पूर्वजांसाठी प्रसाद केला जातो. यानिमित्ताने छाया कदम यांनी कोकणातील म्हाळाची तयारी आणि महिलांचा उत्साह दाखवला आहे. इन्स्टाग्रामवर त्यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये अनेक जणी मिळून या सर्व गोष्टींची तयारी करत असून, चुलीवर स्वयंपाक करत असल्याचे दिसून आले. केळ्याची भाजी आणि अळूची भाजी चुलीवर केली जात असल्याचे दाखवले. त्याचबरोबर इतरही जेवणाची लगबग सुरू असल्याचे छाया यांनी आपल्या व्हिडीओमध्ये दाखवले आहे.

छाया कदम यांना रस्त्यावर दिसली घोरपड

छाया कदम या सोशल मीडियावर कोकणातील सौंदर्य, परंपरा आणि साधी भोळी माणसं दाखवत असतात. म्हाळाचा विधीचा स्वयंपाक सुरू असताना सर्वांनी मिळून चहा आणि वडापावचा आस्वाद घेतला. त्यानंतर सकाळी फिरायला बाहेर पडलेल्या छाया कदम यांना रस्त्यावर घोरपड दिसली. त्याशिवाय सकाळच्या वेळी कोकणात पसरलेले दव, आजूबाजूचा शांत आणि निवांत परिसर, तसेच रस्त्यावर दिसणारी गाई-गुरे अशा सुंदर क्षणांची झलकही त्यांनी दाखवली. कोकणातील या साध्या, पण आनंद देणाऱ्या क्षणांनी नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

याचबरोबर छाया कदम यांचे सुंदर कौलारू घर, घरात मांजरांनी दिलेली सुंदर छोटी पिल्ले आणि शारदीय नवरात्रोत्सवासाठी सुरू असलेली तयारी पाहून नेटकऱ्यांनी त्यांचे कौतुक केले आहे. एका नेटकऱ्याने लिहिले, “गावची सकाळ. मोकळी हवा. स्वच्छ ऑक्सिजन आणि हिरवा निसर्ग किती भारी आहे.” तर आणखी एका नेटकऱ्याने लिहिले, “काय गो किती गोड आसन तुमचो गाव.” तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले, घरातील सर्व बायका तर जबरदस्त आहेतच; पण छायाताई तुमचंपण किती कौतुक करावं, कळत नाही. कारण- प्रत्येक सणाकरिता न चुकता आवर्जून कोकणात येता आणि त्या मातीतल्या बनून जाता.”

त्यानंतर छाया कदम यांनी नवरात्रीत खेळल्या जाणाऱ्या गरब्याची तयारी सुरू असल्याचे दाखवले. यावेळी त्यांनी स्वतःच्या गळ्यात ढोल अडकवून मंदिरात गरबा खेळण्यासाठी सर्वांना आमंत्रण दिले. एवढेच नव्हे, तर गरब्याआधी मंदिराची स्वच्छता करण्यासाठीही त्यांनी गावकऱ्यांना बोलावले. छाया कदम यांचा हा उत्साह आणि कोकणातील सण साजरे करण्याची पारंपरिक पद्धत नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरत आहे.