Chhaya Kadam Kokan Home : मराठी मनोरंजन विश्वातील बरेच कलाकार हे मूळचे कोकणातले आहेत. गणपती, देवदेवाळी, शिमगा अशा सणांना यासह कधीकधी मुंबईतल्या धकाधकीच्या जीवनातून विरंगुळा म्हणून हे सगळे कलाकार आवर्जून कोकणात जातात. कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने सजलेली आहे. निळाशार समुद्र आणि हिरव्यागार डोंगररांगांनी वेढलेला हा परिसर सगळ्याच पर्यटकांचं मन मोहून टाकतो. पावसाळ्यात कोकणातील निसर्ग सौंदर्य अनुभवण्यासाठी पर्यटकांसह मुंबईकर चाकरमानी आवर्जून गावी जातात. लोकप्रिय अभिनेत्री छाया कदम सुद्धा नुकत्याच कोकणात त्यांच्या गावी गेल्या आहेत.

शूटिंगच्या व्यग्र शेड्युलमधून ब्रेक मिळाल्यावर छाया कदम त्यांच्या गावी जातात. त्यांचं गाव सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील धामापूर हे आहे. गावाकडच्या मातीशी अन् परंपरेशी त्यांची घट्ट नाळ जोडलेली आहे. त्या गावच्या सण-उत्सवांमध्ये आवर्जून सहभागी होतात. आता गावी गेल्यावर छाया कदम यांनी आपल्या कुटुंबीयांसह गटारी साजरी केली.

गटारीसाठी कोंबडी वडे, फ्राय फिश असा बेत त्यांच्या घरी करण्यात आला होता. गावचं कौलारू घर, घराच्या आजूबाजूचा निसर्गरम्य परिसर, रिमझिम पाऊस, घरासमोरचा खळा या सगळ्याची झलक अभिनेत्रीने व्हिडीओमध्ये दाखवली आहे.

छाया कदम यांची महत्त्वपूर्ण भूमिका असलेला ‘भूतम भयम्’ सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला. हा सिनेमा त्यांनी आपल्या गावच्या मैत्रिणींना सुद्धा दाखवला. छाया कदम अन् त्यांच्या मैत्रिणी खास टेम्पोने हा चित्रपट पाहण्यासाठी गेल्या होत्या.

छाया कदम यांनी शेअर केलेल्या व्हिडीओवर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. करण सोनावणेने या व्हिडीओवर “मला टांग दिली…जेवण राहिला” अशी कमेंट केली आहे. तर अन्य नेटकरी म्हणतात, “वॉव किती सुंदर गाव आहे”, “आम्हाला पण तुमच्या गावी घेऊन चला”, “किती मोठ्या अभिनेत्री आहेत…पण गावाशी नाळ एकदम घट्ट जोडलीये”, “हा आनंद आणि अशी माणसं फक्त कोकणात भेटतात”, “जबरदस्त…ताई तुम्ही धामापूरच्या आहात ना”, “कोकण म्हणजे स्वर्ग आहे आणि तुमचं धामापूर गाव तर अजूनच छान” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर दिल्या आहेत.