Chhaya Kadam Bengali Language for Gandhari Netflix Movie: आपल्या हटके आणि जिवंत अभिनयातून सिनेविश्वामध्ये वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या छाया कदम या नेहमीच त्यांच्या सिनेमांमुळे चर्चेत असतात. मराठी चित्रपट, हिंदी सिनेविश्व आणि ओटीटी गाजवणाऱ्या छाया कदम प्रभावी अभिनय साकारतात. त्यांच्या अभिनयाचे नेहमीच सर्वत्र कौतुक होत असते. आता नेटफ्लिक्सवर रिलीज झालेल्या ‘गांधारी’ सिनेमामध्ये छाया कदम झळकल्या असून यासाठी त्यांनी वेगळी भाषा शिकली आहे.

इन्स्टाग्रामवर सक्रिय असलेल्या छाया कदम यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्या ‘गांधारी’ या सिनेमासाठी बंगाली भाषा शिकत असल्याचे दिसून येत आहे. बंगाली भाषेतील लकब, बोलण्याची पद्धत आणि उच्चार त्या शिकत असल्याचे दिसून येत आहे. कलाकार हे त्यांच्या भूमिकेला योग्यप्रकारे साकारण्यासाठी विविध प्रकारची तयार करत असतात. आता छाया कदम यांनी ‘गांधारी’मधील भूमिकेसाठी बंगाली भाषा शिकल्याचे दिसून आले आहे.

छाया कदम शिकल्या बंगाली भाषा

छाया कदम यांनी सुश्रुत चट्टोपाध्याय यांच्याकडून बंगाली भाषेचे धडे घेतले आहेत. छाया या प्रत्येक शब्दाचा बंगाली पद्धतीने उच्चार करण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून आले. ‘गांधारी’च्या सेटवर व्हिडीओ शेअर करत त्यांनी नवीन भाषा शिकवल्याबद्दल सुश्रुतचे धन्यवाद मानले आहेत. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले, “प्रत्येक सिनेमा आणि भूमिका आपल्याला खूप काही शिकवते…यावेळी ‘गांधारी’च्या निमित्ताने बंगाली शिकण्याची संधी मिळाली. मी नेहमीच एक विद्यार्थी आहे. या संपूर्ण भाषा शिकण्याच्या प्रवासात माझ्याबद्दल संयम दाखवल्याबद्दल सुश्रुतचे खूप खूप धन्यवाद.”

छाया कदम यांच्या व्हिडीओवर अमृता सुभाष यांची कमेंट

छाया कदम यांच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. अमृता सुभाष यांनी कमेंट करत ‘शाब्बास…’ लिहीत रेड हार्ट कमेंट केले आहेत. तसेच एका नेटकऱ्याने लिहिले, “तुम्ही खूप प्रामाणिक प्रयत्न करता.” तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिले, “मालवणी बंगाली भाषा, खूप छान प्रॅक्टिस, चालू द्या” आणखी एका नेटकऱ्याने मालवणी भाषेत छाया कदम यांच्या अभिनयाचे कौतुक करत लिहिले, “मालवणीत एक म्हण असा, लाथ मारीन थय पाणी काढीन…मालवणी माणूस जिद्दी असा…एकदा ठरवल्यान तर काय करू शकता हेचा ह्या उत्तम उदाहरण म्हणजे आमची छाया ताई, अभिनयाक भाषेचा बंधन नसता पण जीव ओतून काम करना हेका म्हणतात..”

‘गांधारी’ नेटफ्लिक्सवर प्रदर्शित

दरम्यान, ‘गांधारी’ या सिनेमामध्ये अभिनेत्री तापसी पन्नूची मुख्य भूमिका असून तिने ‘बानी’ नावाचे आईचे पात्र साकारले आहे. मुलीचे अपहरण झाल्यानंतर एका आईची धडपड आणि तिचा निश्चिय याचे चित्रण या सिनेमात मांडण्यात आले आहे. या ॲक्शन-थ्रिलर चित्रपटाचे दिग्दर्शन देवाशीष मखिजा यांनी केलं असून पटकथा आणि निर्मिती कनिका ढिल्लन यांनी केली आहे. हा चित्रपट ३ सप्टेंबर २०२६ रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे.