Chhaya Kadam Talks About Nagraj Manjule : नागराज मंजुळे मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय दिग्दर्शक, अभिनेते व निर्माते आहेत. आतापर्यंत त्यांनी अनेक उत्तमोत्तम कलाकृतींची निर्मिती केली आहे. त्यापैकीच एक म्हणजे ‘सैराट’. ज्यामुळे फक्त मराठीच नाही तर त्यांनी महाराष्ट्राबाहेरील अनेकांची मनं जिंकली. अशातच त्यांच्या ‘सैराट’ चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारत घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्री छाया कदम यांनी नुकतंच त्यांच्याबद्दल सांगितलं आहे. छाया यांनी नागराज मंजुळेंबरोबरची मैत्री कशी आहे याबद्दल बोलताना जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.

छाया कदम अनेकदा इंडस्ट्रीतील त्यांच्या अनुभवांबद्दल, चित्रपटांबद्दल आणि कलाकारांबद्दल मनमोकळेपणाने बोलत असतात. त्या अनेकदा त्यांच्या खासगी आयुष्यातील गोष्टीसुद्धा शेअर करत असतात. अशातच आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्याबरोबरच्या मैत्रीबद्दल आणि सेटवर एकत्र काम करण्याच्या अनुभवाबद्दल सांगितलं आहे.

नागराज आणि मी एका ताटात जेवायचो – छाया कदम

छाया कदम यांना मुलाखतीत तुम्ही नागराज मंजुळेंच्या ‘झुंड’ चित्रपटात काम करण्याआधी त्यांच्याबरोबर दोन मराठी चित्रपटात काम केलंय, मग त्यांच्याबरोबर आधी मराठी चित्रपटांत काम केल्यानंतर हिंदीत काम करताना काही वेगळा अनुभव आला का? कारण अनेकदा दोन्ही इंडस्ट्रीतील चित्रपटांच्या सेटवरचं वातावरण वेगळं असतं असं म्हटलं जातं असं विचारल्यानंतर त्या म्हणाल्या, “होत असेल, ते मला माहीत नाही. पण मी नागराजबद्दल सांगू शकते. नागराज बाकी लोकांसाठी वेगळा असेल, माझ्यासाठी तो माझा नागराज आहे. माझा मित्र आहे तो, माझ्या कुटुंबातील सदस्यासारखा आहे. जेव्हा फ्रेंड्री केला तेव्हा आम्ही एका ताटात जेवायचो आणि आताही आम्ही तसेच तितकेच जवळे मित्र-मैत्रीण आहोत. काहीही बदल झालेला नाही.”

नागराज मंजुळेंबद्दल छाया कदम पुढे म्हणाल्या, “मग नागराज मराठी चित्रपटाच्या सेटवर असो, हिंदी चित्रपटाच्या सेटवर असो किंवा इतर कुठे हॉलीवूडमध्ये असो नागराजचं आणि माझं नातं तसंच असेल. नागराजच्या टीममध्ये सुरुवातीपासून जे लोक होते ते त्याच्याबरोबर आजही आहेत. नागराजच्या सेटवर कौटुंबीक वातावरण असतं.” गलाटा इंडियाला दिलेल्या मुलाखतीत छाया यांनी याबद्दल सांगितलं आहे.

दरम्यान, छाया कदम मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. आतापर्यंत त्यांनी अनेक दर्जेदार मराठी कलाकृतींमध्ये काम करत त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. छाया कदम यांनी हिंदीतही त्यांच्या अभिनयाची छाप सोडत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण कली. विशेष करुन ‘कान्स फिल्म फेस्टिव्हल’ या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात उपस्थित राहिल्यानंतर त्यांची लोकप्रियता वाढल्याचं दिसून आलं. महत्त्वाचं म्हणजे यादरम्यान त्यांना हिंदी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘बिग बॉस’कडून ऑफर आल्याचं त्यांनी यामध्ये सांगितलं आहे. परंतु, त्यांनी खासगी गोष्टी जगासमोर मांडणं योग्य वाटत नसल्याने नकार दिल्याचा खुलासा केला आहे.