Chhaya Kadam shares emotional post: छाया कदम यांनी आजपर्यंत अनेक चित्रपटांतून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. ‘लापता लेडीज’, ‘ऑल वुई इमॅजिन ॲज लाईट’, ‘सफेद’, ‘कौन प्रवीण तांबे’, ‘झुंड’, ‘फँड्री’, ‘हंपी’, ‘अंधाधुन’, ‘अंतिम’, ‘गंगुबाई काठियावाडी’ अशा एकापेक्षा एक चित्रपटांत त्यांनी काम केले आहे. विशेष म्हणजे त्यांनी विविध भाषांमध्ये विविध धाटणीच्या भूमिका साकारल्या आहेत.
छाया कदम यांनी शेअर केली भावुक पोस्ट
छाया कदम यांच्या सिनेसृष्टीतील योगदानासाठी त्यांना विविध पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. आता छाया कदम यांनी नुकतीच एक पोस्ट शेअर करत त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी लिहिले, “सरत जाणाऱ्या २०२५ च्या वर्षातला हा माझ्यासाठीचा सगळ्यात भावनिक आणि तितकाच आनंद देणारा क्षण आहे.”
“झी मराठीच्या विशेष योगदान पुरस्कारानं मला सन्मानित करण्यात आलं. कुणास ठाऊक, मंचावरून माझं नाव उच्चारलं जाताच आजवरचा सारा प्रवास मला झटकन आठवला.”
“आज आई हवी होती…”
“कलाकार म्हणून काम करत असताना नेहमीच मनात एक इच्छा असते, ती म्हणजे सर्वत्र आपलं कौतुक होत असलं तरीही आपल्या माणसांकडून कौतुक व्हावं. त्यांच्या कौतुकाची आसच लागून राहिलेली असते. अखेर ‘झी मराठी’नं ही इच्छा पूर्ण केली.”
त्यांनी पुढे लिहिले, “हा सन्मान मी स्वीकारताना माझ्या घरातली, जीवाभावाची माणसं माझा हा सन्मान समोर बसून डोळ्यांत जीव आणून पाहत होती. त्या सगळ्यांना मी रंगमंचावर बोलावलं, कारण त्यांच्याशिवाय माझा हा प्रवास अपूर्ण म्हणण्यापेक्षा शून्यच राहिला असता.”
कुटुंबीयांविषयी छाया कदम यांनी लिहिलं, “ज्या भावानं, माझ्या संतोषनं या क्षेत्रात येण्यासाठी कायम विरोध केला, त्याच्या डोळ्यांत त्या दिवशी आलेलं पाणी बघून मला भरून आलं. माझी वहिनी साक्षी ही आई गेल्यानंतर ती माझ्याबरोबरच साऱ्या घराची आईच झाली, तिच्याबद्दल आणखी वेगळं काय सांगू ?”
ठमाझी बहीण शैला आणि माझा छोटा मित्रच असलेला माझा भाचा सर्वेश तसेच माझी लाडकी बायोसुद्धा आली होती. माझा जीव की प्राण म्हणजे माझी मैत्रीण सुषमा, दिलीप आणि श्रावणी हे सर्वजण उपस्थित होते. आयुष्यात काहीही होऊ दे, माझ्याकडून कितीही चुका होऊ दे, ही दोन माणसं मला कायम सांभाळून घेत आली आहेत. प्रत्येक परिस्थितीत माझ्याबरोबर ती खंबीरपणे उभी राहतात.”
पुढे आईची उणीव भासली असेही त्यांनी लिहिले, “सरतेशेवटी हा सगळा आनंद डोळ्यांत, मनात भरून घेत असताना खूप दाटून आलं. आज आई हवी होती. कशीही का असेना, थकलेली, वाकलेली पण या क्षणाला आई हवीच होती. तिला मला सांगायचं होतं की तू ज्या चॅनेलवरच्या मालिका पाहायची ना, त्या चॅनेलच्या मंचावर आज मी उभी आहे. तिला खूप आनंद झाला असता. पण असो.”
“हा प्रवास असाच…”
झी मराठीचे आभार मानत छाया कदम यांनी लिहिले, “‘झी मराठी’चे मनापासून आभार की त्यांनी हा सुंदर क्षण माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या ओंजळीत घातला.”
रवी जाधव यांच्याबद्दल त्यांनी लिहिले, “रवी तू बाजूला उभा होतास, पण नेहमी माझ्यासाठी भक्कम आधारासारखा असतोस; असाच कायम माझ्याबरोबर राहा.”
शेवटी त्यांनी लिहिले, “आता थांबते, पण हा प्रवास असाच सुरू राहील. तुमच्या सगळ्यांचं प्रेम, आशीर्वादच माझ्यातल्या छायाला दरवेळी नव्या भूमिकेसाठी ताकद देणारे आहेत. वर्ष येतील, जातील पण त्या साऱ्यात आपल्या माणसांना जपूया. त्यांच्या आनंदासाठी जगूया. तुम्हा सगळ्यांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. काळजी घ्या, नव्या वर्षात, नव्या गोष्टींबरोबर भेटूया”, असे लिहित छाया कदम यांनी भावना व्यक्त केल्या.
दरम्यान, ही पोस्ट शेअर करताना त्यांनी या कार्यक्रमातील खास फोटोदेखील पोस्ट केले आहेत.
