Chinmay Mandlekar’s Wife Neha Recalls Son’s Name Controversy : लेखन आणि दिग्दर्शनासह आपल्या दमदार अभिनयाने चर्चेत राहणारा लोकप्रिय अभिनेता म्हणजे चिन्मय मांडलेकर. आजवर अनेक कलाकृतींमधून चिन्मयने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. लेखन, दिग्दर्शन आणि अभिनयामुळे चर्चेत राहणारा चिन्मय मध्यंतरी त्याच्या मुलाच्या नावावरून झालेल्या वादामुळे चांगलाच चर्चेत आला होता.

मुलाचं नाव ‘जहांगीर’ ठेवल्यामुळे चिन्मयवर बरीच टीका झाली होती. त्याला सोशल मीडियावरील ट्रोलिंगला सामोरे जावे लागले होते. अभिनेत्यावरील प्रचंड टीकेनंतर त्याची पत्नी नेहा हिनेही व्हिडीओ शेअर करत टीकाकारांना स्पष्ट उत्तर दिलं होतं. अशातच आता तिने पुन्हा एकदा मुलाच्या नावावरून झालेल्या ट्रोलिंगबद्दल आपली प्रतिक्रिया दिली आहे.

“गुन्हा केला असेल, तर भारत सरकार अटक करेल”

अनुरूप विवाह संस्थाला दिलेल्या मुलाखतीत नेहा म्हणाली, “तेव्हा मला खूप त्रास झाला होता. ज्या आईने मुलासाठी यातना सोसल्या आणि मोठ्या दिव्यातून गेली. त्या मुलाचे नाव मी काय ठेवलं? हे विचारणारं कुणीही कसं असू शकतं? या जगात मला तो प्रश्न कुणीही कसा काय विचारू शकतं? मला हेही कळतं की, पब्लिक फिगर म्हणून आम्ही आमच्या कामाच्या कौतुकाची अपेक्षा ठेवतो; तर त्याच कामावरून होणाऱ्या टीकेची तयारीसुद्धा ठेवली पाहिजे. पण हे काही काम नाही. ते माझं वैयक्तिक आयुष्य आहे. तेव्हा मला हा त्रास झाला की, त्या मुलाचे फक्त बाबा नाहीत, तर आईसुद्धा आहे, जी या क्षेत्रात नाही. तिला एक नाव आवडलं आणि तिने ते ठेवलं. त्यावर मला कुणीतरी असं सांगू शकतं की, त्या नावाचा अर्थ जगज्जेता आहे तर मग तुम्ही विश्वजीत किंवा पृथ्वीराज नाव का नाही ठेवलं. नाही… मला दगडू नाव ठेवायचं असेल तर मी ठेवणार. मला कुणी का विचारावं? आणि मी जर इतका मोठा गुन्हा केला असेल, तर भारत सरकार मला अटक करेल. ती केली का? नाही ना… मला माझ्या संविधानाने दिलेला हक्क मी बजावत आहे. मी माझ्या आई असण्याचा हक्क बजावत आहे.”

“ट्रोल करणाऱ्यांपैकी एकानेही माझ्या समोर यावं”

यापुढे नेहा म्हणाली, “झालेल्या टीकेवर यात एवढं काय आहे? असं कुणीही बोलू शकत नाही… कारण मी अशी मुलगी आहे जिला सिग्नल मोडल्याचा, गाडी चालवताना बाईकडे वाईट नजरेने बघितल्याचा त्रास होतो. मी तशीच आहे आणि माझ्यासारखी माणसे आहेत म्हणून जगात थोडी तरी शिस्त आहे. त्यामुळे ज्यांना कळतं किंवा ज्यांचं काहीतरी म्हणणं आहे, मग ते चूक किंवा बरोबर काहीही असो त्यांनी बोललं पाहिजे. त्यामुळे तेव्हा त्या सगळ्या प्रकरणाचा मला खूप त्रास झाला. माझं म्हणणं आहे की, ट्रोल करणाऱ्यांपैकी एकानेही माझ्या समोर यावं, इतिहासाबद्दल बोलायचं आहे का? ठीक आहे… इतिहासापासून सगळं बोलू. मग मी नाव चुकीचं किंवा बरोबर आहे आणि कसं तुमचं बरोबर किंवा तुमचं चुकीचं हे ठरवू…”

“मुलाच्या नावावरून बाईच्या चारित्र्याबद्दल…”

शेवटी नेहा असं म्हणाली, “आता मला त्याने काही फरक पडत नाही. पण अर्थात यासाठी खूप वर्षे गेली. ज्यांचे नाव पुढे करून लोक ट्रोल करतात आणि मुलाच्या नावावरून एका बाईच्या चारित्र्याबद्दल बोललं गेलं, ते जर आज असते तर त्यांनी टकमक टोकावरून खाली फेकलं असतं. ते माझ्या आयुष्यातील खूप महत्त्वाची व्यक्ती आहेत. चिन्मय माझा नवरा आहे म्हणून नाही; तर माझ्या लहानपणापासून त्यांचा माझ्यावर पगडा आहे. त्यामुळे मी कुणाचं ऐकत नसते.”