मराठी सिनेविश्वातील अनेक लोकप्रिय कलाकारांची मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबरोबर खूप चांगली मैत्री आहे. मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कार्यक्रमांना राज ठाकरे आवर्जून उपस्थित राहतात. याशिवाय मराठी सिनेमांना चित्रपटगृहात हक्काचा शो टाइम आणि स्क्रिन्स मिळाव्यात यासाठी मनसेने अनेकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. अनेक मराठी कलाकृतींचं राज ठाकरेंनी स्वत: पोस्ट शेअर करत कौतुक केल्याचं पाहायला मिळालं आहे.
राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी नुकतेच चिन्मयी व सुमीत राघवन पोहोचले होते. हे जोडी सध्या ‘ही दोस्ती तुटायची नाय’ या नाटकात एकत्र काम करतेय. या नाटकाच्या ५० व्या प्रयोगाचं खास आमंत्रण देण्यासाठी हे दोघंही राज ठाकरेंच्या घरी पोहोचले होते. याशिवाय सुमीत राघवनने ‘दोस्तीचा “राज”योग’ ही खास पोस्ट शेअर करत, ३८ वर्षांपूर्वी राज ठाकरेंबरोबर पहिली भेट केव्हा अन् कुठे झाली होती, याचा खास किस्साही सांगितला आहे.
सुमीत राघवनची पोस्ट
दोस्तीचा “राज”योग..
फार क्वचितच असं होतं की, एखादा विचार डोक्यात येतो आणि त्याला लगेच मूर्तरूप प्राप्त होतं..नाही का?
झालं असं की “अष्टविनायक आणि नाट्यलीला निर्मित”… ‘ही दोस्ती तुटायची नाय’च्या ५० व्या प्रयोगाला एक असं जोडपं बोलवावं ज्यांच्या दोस्तीचं रूपांतर लग्नात झालं आहे. अशी बरीच जोडपी आहेत पण, जे पहिलं नाव डोळ्यासमोर आलं ते “राज – शर्मिला”…हे मी चिन्मयीकडे बोलून दाखवलं तर तिने फोन लावला आणि समोरून राज दादाचा आवाज.. आणि त्यांनी तारीख आणि वेळ दिली. त्यामुळे या भेटीचं सगळं श्रेय चिन्मयीला जातं. कारण, मराठी भाषेच्या आणि मराठी शाळांच्या कामानिमित्त वरचेवर राज दादाला ती भेटत असते. त्यामुळे, या भेटीचा योग तिनेच घडवून आणला.
बरं आता ३८ वर्षे मागे जाऊयात…
साल १९८८-८९, मी रुपारेल कॉलेजला F.Y.B.com ला प्रवेश घेतला होता आणि तेव्हा पहिल्यांदा राज दादाला भेटलो. त्याला आठवत नसेल पण कॅन्टीन जवळ आमची ओळख झाली होती आणि नंतर कर्नाटक हॉलमध्ये BVS च्या मेळाव्यात मी राज दादाला बोलताना ऐकलं आणि भारावून गेलो. पुढे, जशी वर्ष गेली तसं कळलं की तो नुसता कलाप्रेमी नाही तर कलाकारांच्या कामाकडेही त्याचं बारीक लक्ष असतं.१९८९ साली मी माझं दुसरं व्यावसायिक नाटक केलं, “रंग उमलत्या मनाचे” आणि संस्था होती मोहन (वाघ) काकांची “चंद्रलेखा”. तेव्हा पद्मा मावशी, अपर्णा आणि शर्मिला यांची ओळख झाली आणि शर्मिलाशी एक वेगळाच बॉण्ड तयार झाला. तो बॉण्ड म्हणजे घट्ट मैत्रीचा. तर ही झाली पार्श्वभूमी…
१९९१ साली मी आणि चिन्मयीने “चंद्रलेखा” साठी “ज्वालामुखी” हे नाटक केलं होतं. तेव्हा मोहन काकांच्या संस्थेत आम्ही फक्त नट होतो आणि आज आम्ही दोघेही निर्माते सुद्धा झालो आहोत त्यामुळे आमच्या नाटकाला मोहन काकांची मुलगी आणि जावई यांचं हजर असणं हा देखील आम्हा दोघांसाठी एक जबरदस्त योगायोग असणार होता. तर असे विचार घेऊन आम्ही निमंत्रण द्यायला शिवतीर्थावर गेलो.
खूप गप्पा झाल्या. “राज” शैलीतले किस्से झाले, विनोद झाले. त्याच्या निरीक्षण शक्तिबद्दल, स्मरण शक्तिबद्दल काय बोलावं आणि हजरजबाबीपणा म्हणजे कमाल…त्यात जुन्या आठवणी ताज्या झाल्या. एक तास कसा गेला ते कळलंच नाही..दुसर्या दिवशी आम्ही चिंचवडचा प्रयोग संपवून बालगंधर्वला जात होतो तेव्हा चिन्मयीला मेसेज आला की “आम्ही प्रयोगाला येणार आहोत” तर..मित्रांनो, रविवार २१ जून, दुपारी ३.४५ वाजता दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात “ही दोस्ती तुटायची नाय” च्या ५० व्या प्रयोगाला राज दादा आणि शर्मिला उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान, ‘ही दोस्ती तुटायची नाय’ या नाटकात चिन्मयी सुमीत, अमृता बने, शुभंकर एकबोटे आणि सुमीर राघवन हे कलाकार प्रमुख भूमिका साकारत आहेत. या नाटकाचं लेखन ओंकार गोखलेने केलं असून या नाटकाचं दिग्दर्शन सुरज पारसनीसने केलं आहे.
