Chirag Patil on Nana Patekar: ‘मराठी पाऊल पडते पुढे’, ‘वेकअप इंडिया’, ‘येक नंबर’, ‘वजनदार’, ‘असेही एकदा व्हावे’, ‘८३’, ‘अकिरा’ अशा अनेक सिनेमांत काम करीत चिराग पाटीलने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्याने करिअरच्या सुरुवातीचा काळ सांगितला आहे. तसेच, सुरुवातीच्या ऑडिशनसंबंधीची आठवण सांगितली आहे.
“मी अंधेरीत आलो की, आजही मला धडकी भरते”
चिराग पाटीलने नुकतीच राजश्री मराठीला मुलाखत दिली. त्या मुलाखतीत तो म्हणाला, “मी अंधेरीत आलो की, आजही मला धडकी भरते. अगदी दुसऱ्या कामासाठीसुद्धा मी कधी चार बंगला, सात बंगल्याला आलो तरी मला धडकी भरते. कारण- इतक्या ऑडिशन दिल्या आहेत. इतक्या मीटिंग तिथे झाल्या आहेत. पण, मला आठवतंय, तेव्हा नुकतीच दहावीची परीक्षा झालेली. मला अजिबात अभ्यासात रस नव्हता. मला असिस्टंट म्हणून काम करायचं होतं. जर मागे वळून पाहिलं, तर मला वाटतं की, मी ते केलं पाहिजे होतं. पण, दुर्दैवानं आई-बाबांना किंवा आजूबाजूच्या लोकांनाही ते माहीत नव्हतं की, फिल्ममध्ये येण्यासाठी काय करावं लागतं.”
“नानासर आले आणि…”
पुढे तो म्हणाला, “मला पहिली मीटिंग आठवतेय. बाबांचे खूप चांगले मित्र, माझे खूप आवडते कलाकार आणि माणूस नाना पाटेकर आहेत. बाबांनी त्यांना फोन लावला, अरे एक काम आहे. ते तेव्हा पुण्याला होते. तर, मी आई-बाबा पुण्याला गेलो. मी त्यांना भेटण्यासाठी खूप उत्सुक होतो. नानासर आले आणि बसले. मी आपला त्यांच्याकडे नुसता बघत होतो. बाबा आणि ते बोलत होते. मग त्यांनी बाबांना विचारलं की, काय काम होतं? बाबा म्हणाले की, हा माझा मुलगा आहे. त्याला अभिनेता व्हायचं आहे. त्यांनी माझ्याकडे बघितलं आणि मला म्हणाले की, उभा राहा. मी उभा राहिलो. ते म्हणाले, जा शेवटचं जे टेबल आहे, तिथंपर्यंत चालून ये. मी गेलो आणि चालून आलो. ते माझ्याकडे बघत होते. मला म्हणाले की, बस आणि बाबांना म्हणाले की, सॅन्डी, मेहनत केली हा अभिनेता होईल. एवढंच बोलले. त्यानंतर पुन्हा त्यांच्या गप्पा सुरू झाल्या. सिनेसृष्टीतील व्यक्तीबरोबरचा तो माझा पहिला अनुभव होता.”
“साडेतीन तास थांबल्यानंतर ते स्वत: त्यांच्या…”
चिराग असेही म्हणाला, “बाबांनी माझी दुसरी मीटिंग सुभाष घईंबरोबर ठेवली होती. बाबांनी मला सांगितलं की तू जा, तू ऑफिस शोध. मीटिंग चांगली झाली. ते म्हणालेले की, तू अजून लहान आहेस. तुला ट्रेनिंग घ्यायची गरज आहे. पण, माझी सुरुवात अशी झाली होती. त्यानंतर खूप ऑडिशन झाल्या. खूप तास मी लाईनमध्ये थांबलेलो आहे. एकदा तर मी एका दिग्दर्शकाच्या ऑफिससमोर बसलो होतो. ते येत आहेत, असं मला सांगितलेलं. साडेतीन तास थांबल्यानंतर ते स्वत: त्यांच्या केबिनमधून बाहेर आले आणि बाहेर निघून गेले. हे अनेक कलाकारांबरोबर होतं. त्यामुळे मी याला हा माझा संघर्ष वगैरे मानत नाही. ही प्रोसेस आहे”, असे म्हणत चिरागने सुरुवातीच्या दिवसांची आठवण सांगितली.
