रसिक प्रेक्षकांच्या प्रेमामुळे मराठी रंगभूमीवर गेल्या काही वर्षांपासून अनेक लोकप्रिय नाटकांची दमदार वाटचाल सुरू आहे. ‘चिरंजीव परफेक्ट बिघडलाय!’ हे नाटक अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं आहे. या नाटकाने आपल्या यशस्वी वाटचालीत शंभर प्रयोगांचा अभिमानास्पद टप्पा गाठला आहे.
चंद्रकांत कुलकर्णी प्रस्तुत आणि विनोद रत्ना लिखित-दिग्दर्शित ‘चिरंजीव परफेक्ट बिघडलाय!’ या नाटकाचा शतक महोत्सवी प्रयोग नुकताच अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर पार पडला. या विशेष प्रयोगाला ज्येष्ठ अभिनेते पद्मश्री अशोक सराफ, निवेदिता सराफ, सचिन पिळगांवकर, सुप्रिया पिळगांवकर, आदेश बांदेकर, सुचित्रा बादेकर यांसह अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती.
“या नाटकाचा शतक महोत्सवी प्रयोग एवढ्या उत्साहात साजरा होताना पाहणं, हा खरोखरच आनंददायी आणि अभिमानास्पद क्षण आहे” असं यावेळी अशोक सराफांनी सांगितलं. तर, ‘परफेक्ट अभिनय, दिग्दर्शन आणि कास्टिंग’ या शब्दांत अभिनेते सचिन पिळगांवकर यांनी या नाटकाचं मनापासून कौतुक करत शुभेच्छा दिल्या आहेत. मनोरंजन क्षेत्राला सुवर्णकाळ देणाऱ्या मान्यवरांकडून अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर आशीर्वाद लाभणं, ही तरुण कलाकारांसाठी खरोखरच भाग्याची गोष्ट असल्याची भावना अभिनेते आदेश बांदेकर यांनी व्यक्त केली.
प्रेक्षकांच्या मनात घर करणाऱ्या या नाटकाची खासियत म्हणजे त्याची समकालीन आणि तरुण पिढीशी थेट जोडणारी कथा. आजच्या Gen Z पिढीच्या भावना, विचार… हलक्याफुलक्या विनोदी शैलीत मांडले गेल्यामुळे हे नाटक रसिकांना आपलंसं वाटतं. श्रीपाद पद्माकर आणि दिलीप जाधव या नाटकाचे निर्माते आहेत. श्रेयस जोशी, वैभव रंधवे आणि समृद्धी कुलकर्णी या नवोदित कलाकारांनी या नाटकात प्रभावी भूमिका साकारल्या आहेत. या नाटकामुळे प्रेक्षकांशी एक वेगळं नातं निर्माण झालं आहे. प्रत्येक प्रयोगात मिळणाऱ्या टाळ्या हेच आमचं खरं यश आहे. अशी भावना कलाकारांनी व्यक्त केली.

उत्कृष्ट लेखन, दिग्दर्शन आणि नवोदित कलाकारांची दमदार कामगिरी यामुळे ‘चिरंजीव परफेक्ट बिघडलाय!’ हे नाटक सध्या रंगभूमीवर चर्चेचा विषय ठरत असून, आगामी काळातही हे नाटक प्रेक्षकांचं असंच भरभरून मनोरंजन करत राहील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
