Zakir Khan on Tighi Marathi Movie: मराठी चित्रपटसृष्टीतील कसलेल्या अभिनेत्रींची फौज असलेला ‘तिघी’ हा चित्रपट सध्या यशाची नवनवीन शिखरे सर करत आहे. जीजिविषा काळे दिग्दर्शित हा चित्रपट चौथ्या आठवड्यातही सिनेमागृहात पाय रोवून उभा आहे. या चित्रपटातील आई आणि दोन मुलींच्या संवेदनशील नात्याची कथा प्रेक्षकांच्या थेट काळजाला भिडली आहे. विशेष म्हणजे, प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन झाकीर खान याने हा चित्रपट पाहिल्यानंतर त्याचे भरभरून कौतुक केले आहे. “हा चित्रपट इतका सुंदर आहे की तुम्हाला भाषा येत नसली तरी तो भावेल,” अशा शब्दांत झाकीरने ‘तिघी’वर प्रेमाचा वर्षाव केला आहे.
‘तिघी’ नावाचा एक अत्यंत सुंदर चित्रपट ६ मार्च २०२६ रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला. या चित्रपटाचं फक्त मराठीच नाही, तर हिंदी प्रेक्षकही खूप कौतुक करत आहेत. प्रसिद्ध कॉमेडियन झाकीर खानने ‘तिघी’ हा मराठी चित्रपट पाहिला असून त्याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.
झाकीर खानची ‘तिघी’बद्दल पोस्ट
झाकीर खानने हा चित्रपट पाहिल्यानंतर इन्स्टाग्रामवर स्टोरी पोस्ट केली. “मी गेल्या आठवड्यात हा चित्रपट पाहिला. अत्यंत सुंदर चित्रपट आहे. लवकर जा आणि तुम्हीही हा चित्रपट पाहा. तुम्ही मराठी बोलत नसाल, तरी हा चित्रपट तुम्हाला समजेल,” असं झाकीर खानने लिहिलंय.

‘तिघी’मधील कलाकारांची मांदियाळी
तिघी चित्रपटात तीन पिढ्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या तीन कसलेल्या अभिनेत्री एकत्र आल्या आहेत. तिघींनी या चित्रपटात आपल्या उत्कृष्ट अभिनयाची चुणूक दाखवली आहे. या सिनेमात भारती आचरेकर यांनी हेमलता नावाची आईची भूमिका साकारली आहे. हेमलताला कॅन्सर या गंभीर आजाराने ग्रस्त आहे. सिनेमात नेहा पेंडसेने मोठी मुलगी स्वातीची भूमिका केली असून सोनाली कुलकर्णी धाकटी बहीण सारिकाच्या भूमिकेत आहे. या सिनेमात पुष्कराज चिरपुटकर, निपुण धर्माधिकारी, जैमिनी पाठक यांनीही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.
‘तिघी’ चित्रपटाची कथा
हा चित्रपट एका आई आणि तिच्या दोन विवाहित मुलींच्या नात्यावर आधारित आहे. आईच्या आजारपणामुळे एकमेकींपासून दुरावलेल्या दोन बहिणी पुन्हा एकत्र येतात. कथेतून मध्यमवर्गीय कुटुंबातील गुंतागुंत, स्त्रियांच्या आयुष्यातील संघर्ष, एकमेकींबद्दल असलेले गैरसमज आणि अखेर आईच्या आजारपणामुळे निर्माण झालेला भावनिक बंध अतिशय संवेदनशीलपणे मांडला आहे. भारती आचरेकर यांनी एका खंबीर पण आजारी आईची भूमिका अतिशय प्रभावीपणे साकारली असून त्यांच्या अभिनयाचे समीक्षकांनी खूप कौतुक केले आहे.
