लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या बहुप्रतिक्षित ‘दर्याभवानी’ चित्रपटाचा मुहूर्त नुकताच पार पडला आहे. शुभारंभाच्या प्रसंगी दिग्पाल लांजेकर यांनी पारंपरिक पद्धतीने गाऱ्हाणं घालत चित्रपटाच्या यशाबरोबरच ‘दर्याभवानी’ सिनेमाशी जोडलेल्या प्रत्येक कलाकाराच्या, तंत्रज्ञांसह टीममधील प्रत्येक सदस्याच्या सुख-समाधानासाठी मनापासून प्रार्थना केली. त्यांनी चित्रपटाच्या निर्मितीसाठी पडद्यामागे आणि पडद्यावर मेहनत घेणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे आभार मानले. संपूर्ण टीमच्या कल्याणासाठी केलेल्या या प्रार्थनेमुळे ‘दर्याभवानी’ चित्रपटाचा मुहूर्त केवळ चित्रपटाच्या शुभारंभाचा सोहळा न राहता, एकजूट, कृतज्ञता आणि आपुलकीचा सुंदर क्षण ठरला.
‘दर्याभवानी’ हा केवळ एक ऐतिहासिक चित्रपट नसून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदर्शी सागरी धोरणाला आणि मराठी आरमाराच्या अद्वितीय पराक्रमाला मोठ्या पडद्यावर साकार करणारा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या भव्य ऐतिहासिक प्रवासाची सुरुवात करताना दिग्पाल लांजेकर यांनी आपल्या संपूर्ण टीमलाच या शुभारंभाच्या केंद्रस्थानी ठेवत केलेली प्रार्थना विशेष लक्षवेधी ठरली.
लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या आगामी ‘दर्याभवानी’ चित्रपटाची निर्मिती श्री तिरुपती बालाजी चित्रचे प्रकाश पाटील, डॉ. अशोक जीवतोडे आणि एलेवेट फिल्म्सचे पवन सादमवार, सुरज सादमवार यांनी केली असून, पुष्कर यावलकर हे सहनिर्माते आहेत.
‘श्री शिवराज अष्टक’ मालिकेतील सातवा चित्रपट
या मुहूर्ताच्या प्रसंगी कलाकार, निर्माते आणि तंत्रज्ञ मोठ्या उत्साहात उपस्थित होते. पारंपरिक ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’, ‘शेर शिवराज’, ‘सुभेदार’ आणि ‘रणपति शिवराय’ या गाजलेल्या चित्रपटांनंतर ‘श्री शिवराज अष्टक’ मालिकेतील सातवा चित्रपट म्हणून ‘दर्याभवानी’कडे प्रेक्षक मोठ्या उत्सुकतेने पाहत आहेत.

‘हे’ कलाकार झळकणार
आता हे सातवं पुष्प कान्होजी आंग्रे यांच्या समुद्रातील आरमार उभारणीवर आधारित असणार आहे. या ‘दर्याभवानी’ चित्रपटाचं पोस्टर देखील रिलीज करण्यात आलं आहे. अभिजीत श्वेतचंद्र, मृणाल कुलकर्णी, समीर धर्माधिकारी, स्मिता शेवाळे, अजय पूरकर, मृण्मयी देशपांडे, ऋषी सक्सेना, आस्ताद काळे, प्रसन्न केतकर, निखिल राऊत, नितीन वाघ, सचिन देशपांडे हे कलाकार या सिनेमात झळकणार आहेत. हा सिनेमा १५ जानेवारी २०२७ रोजी प्रदर्शित होणार आहे.
