रिक्षाच्या मागे दिसणारी ‘बुरी नजरवाले.. तेरा मुँह काला’ ही ओळ प्रत्येकाने वाचली असेल…पण ‘दशमी’ या आगामी मराठी चित्रपटामध्ये हीच ओळ जेव्हा भन्नाट ठेक्यावर ऐकू येते, तेव्हा पावलं आपोआप थिरकायला लागतात! देसी शब्दांचा तडका, नकाश अझीझ या गायकाचा जोशपूर्ण आवाज आणि सुरेश पंडित यांचं दमदार संगीत यामुळे हे गाणं ‘दशमी’चं खास आकर्षण ठरणार आहे.
‘दुनियेवर राज करेल दिलवाला, बुरी नजरवाले..तेरा मुँह काला’ हे गाणं चित्रपटाला एक वेगळीच एनर्जी देणार आहे. या गाण्यात अभिनेत्री गौरी इंगवले, राज कुंदन, अभिनेते मकरंद अनासपुरे, विजय निकम हे कलाकार ठेका धरताना दिसत आहेत. हे गाणं प्रेक्षकांना नक्कीच ताल धरायला भाग पाडणार आहे. वैभव देशमुख यांनी हे गाणं लिहिलं आहे. तसेच ‘दशमी’ चित्रपटातील गाणी ही ‘व्हिडिओ पॅलेस’ने प्रकाशित केली आहेत.
रिक्षांवरच्या भन्नाट लिखाणाला सिनेमाच्या पडद्यावर नवा रंग देणारं हे गाणं प्रेक्षकांसाठी खास आकर्षण ठरणार आहे. मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या वेगळ्या विषयांमुळे चर्चेत असलेला ‘दशमी’आता एका हटके गाण्यामुळे प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे.
केएनके बॉक्स प्रस्तुत ‘दशमी’ हा मराठी चित्रपट ऑक्टोबरमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाची निर्मिती व दिग्दर्शन योगेश पांडुरंग भोसले यांचे आहे. लेखन आणि संगीत याची जबाबदारी सुरेश पंडित यांनी सांभाळली आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी अन्याय, संघर्ष आणि सत्याची परीक्षा येते. अशा वेळी परिस्थितीसमोर न झुकता सत्याच्या बाजूने उभं राहण्याचं धैर्य ‘दशमी’ची कथा देते.
विजय, शक्ती आणि संघर्षाची झलक दाखवणाऱ्या ‘दशमी’ चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरचं अनावरण नुकतंच करण्यात आलं. प्रत्येक संघर्षातून उभा राहणारा विजय म्हणजेच खरी ‘दशमी’ हा विचार प्रभावीपणे मांडणाऱ्या या चित्रपटात महेश मांजरेकर, मकरंद अनासपुरे, विजय निकम, गौरी इंगवले, प्रसन्न केतकर, देवेंद्र गायकवाड, शाम माशाळकर, राज कुंदन आणि दाक्षिणात्य स्टार अभिनेते रवि प्रकाश असे नामवंत कलाकार झळकणार आहेत.
दिग्दर्शक योगेश भोसले याबद्दल म्हणाले, “दशमी’ हा विचार आहे, जो प्रत्येक मुलीला आणि प्रत्येक कुटुंबाला आत्मविश्वास आणि बळ देतो. ‘दशमी’ हा केवळ एक चित्रपट नाही, तर प्रत्येक माणसाच्या आयुष्यातील अन्यायाविरुद्ध उभं राहण्याच्या धैर्याचा आणि सत्याच्या विजयाचा प्रवास आहे. केवळ मनोरंजन नव्हे, तर प्रेक्षकांना विचार करायला लावणारा आणि मनात दीर्घकाळ घर करणारा हा सिनेमा असेल.”
