Riteish Deshmukh Raja Shivaji Movie : रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ सिनेमा १ मे रोजी ( महाराष्ट्र दिन ) संपूर्ण देशभरात प्रदर्शित झाला. पहिल्याच दिवशी या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केल्याचं पाहायला मिळत आहे. याशिवाय चित्रपटातील सगळ्याच कलाकारांचं भरभरून कौतुक करण्यात येत आहे. रितेश-जिनिलीयाने या सिनेमात छत्रपती शिवाज महाराज व सईबाई राणीसाहेबांची भूमिका साकारली आहे. ‘राजा शिवाजी’ चित्रपटाच्या प्रीमियर शोला देशमुख कुटुंबीय सुद्धा उपस्थित होते.

रितेश भाऊ धिरज व वहिनी दीपिशिखा देशमुख यांनी देखील ‘राजा शिवाजी’ चित्रपट पाहिल्यावर खास पोस्ट शेअर करत या रितेश-जिनिलीयाचं भरभरून कौतुक केलं आहे. विशेषत: दीपिशिखाने जिनिलीयासाठी खास पोस्ट लिहिली आहे. वहिनींना सईबाईंच्या भूमिकेत पाहिल्यावर डोळे भरून आले, अंगावर काटा आल्याचं दीपिशिखाने म्हटलं आहे.

दीपशिखा देशमुख लिहिते, “जिनिलीया वहिनी…तुम्ही सईबाई राणीसाहेबांची भूमिका साकारलीये. सिनेमात मध्यांतरानंतरचे सईबाई आणि महाराजांमधील संवाद ऐकून, तुम्हा दोघांनी सादर केलेले सीन्स पाहून माझे डोळे पाणावले, अंगावर काटा आला. मी प्रचंड भावुक झाले होते. प्रत्येक पत्नीला हा त्याग अन् वेदना निश्चितपणे जाणवतील. महाराणी सईबाईंची भूमिका इतक्या सुंदर अन् प्रभावीपणे साकारल्याबद्दल तुमचं खूप कौतुक. ही भूमिका माझ्या हृदयाला स्पर्शून गेली.”

सध्या संपूर्ण मनोरंजनविश्वातून ‘राजा शिवाजी’ चित्रपटावर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे. राजकुमार राव, विवेक ओबेरॉय, जॅगी भगनानी अशा बऱ्याच कलाकारांनी रितेश-जिनिलीयासाठी खास पोस्ट शेअर करत त्यांचं कौतुक केलं आहे.

genelia
जिनिलीयासाठी जाऊबाई दीपिशिखा देशमुख यांची पोस्ट

दरम्यान, रितेश देशमुख दिग्दर्शित राजा शिवाजी सिनेमा १ मे रोजी प्रदर्शित झाला आहे. यामध्ये रितेशसह महेश मांजरेकर, भाग्यश्री, अभिषेक बच्चन, सचिन खेडेकर, अभिषेक बच्चन, संजय दत्त, विद्या बालन, फरदीन खान, जिनिलीया देशमुख यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने १० कोटींहून अधिक गल्ला जमावला आहे. या चित्रपटाचं लेखन, दिग्दर्शन, निर्मिती आणि मुख्य भूमिका या सर्व जबाबदाऱ्या रितेशने समर्थपणे सांभाळल्या आहेत. याशिवाय रितेशची दोन्ही मुलं रियान आणि राहील यांनी देखील या सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.