Deool Band 2 box office collection day 8: एकापेक्षा एक मराठी सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ हा सिनेमा १ मे रोजी प्रदर्शित झाला होता. या सिनेमाने १०० कोटींहून अधिक कमाई केली आहे. या सिनेमाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.
काही दिवसांपूर्वीच ‘देऊळ बंद २’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. आगामी काळात ‘तुंबाडची मंजुळा’, ‘कप-बशी’ असे एकापेक्षा एक सिनेमे प्रदर्शित होणार असल्याने ही प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची मेजवानी आहे.
‘देऊळ बंद २’ हा सिनेमा २१ मे ला प्रदर्शित झाला. प्रदर्शित होण्याआधीपासूनच टीझर व ट्रेलरमुळे ‘देऊळ बंद २’ हा सिनेमा मोठ्या प्रमाणात चर्चेत होता. सिनेमातील प्रत्येक पात्र, सिनेमाची गोष्ट लक्ष वेधून घेत असल्याचे पाहायला मिळत आहे. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.
आता या सिनेमाने आठ दिवसांत किती कमाई केली, याबद्दल जाणून घेऊयात. ‘देऊळ बंद २’ या सिनेमाचे दिग्दर्शन प्रवीण तरडे यांनी केले आहे. तसेच, त्यांनी या सिनेमात भूमिकाही साकारली आहे. त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत ‘देऊळ बंद २’ने आठ दिवसांत किती कमाई केली आहे हे सांगितले.
‘देऊळ बंद २’ने आठव्या दिवशी किती केली कमाई?
प्रवीण तरडे यांनी शेअर केलेल्या पोस्टरवर सिनेमाची एकूण कमाई आणि सिनेमाने आठव्या दिवशी किती कोटींची कमाई केली आहे हे लिहिले आहे. गुरुवारी या सिनेमाने ४.५५ कोटींची कमाई केली आहे, तर सिनेमाने आठ दिवसांत एकूण ३२.८२ कोटींची कमाई केली आहे.
प्रवीण तरडेंच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत व शुभेच्छा दिल्या आहेत. काहींनी सिनेमा ५० कोटींहून अधिक कमाई करेल असे म्हटले आहे; तर काहींनी १०० कोटींहून अधिक कमाई करेल असे म्हटले आहे, तर अनेकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. एकाने लिहिले, “देऊळ बंद २ चित्रपट पाहिल्यानंतर खचून गेलेल्या माणसाला जगण्याची नवीन उमेद निर्माण होते”, तर अनेकांनी श्री स्वामी समर्थ अशी कमेंट केली आहे.



या सिनेमात स्नेहल तरडे, मोहन जोशी, प्रसाद ओक, मंगेश देसाई, संस्कृती बालगुडे असे अनेक कलाकार दिसले आहेत. आता आगामी काळात सिनेमा किती कमाई करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
