Deool Band 2 Box Office Collection Day 5 : प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘देऊळ बंद २’ चित्रपटाची सध्या संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार चर्चा सुरू आहे. या सिनेमाने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी ३.०५ कोटींची कमाई केली होती. पुण्यात ‘देऊळ बंद २’चे अनेक शो हाऊसफुल्ल सुरू आहेत. इतकंच नव्हे तर पहाटे साडेपाच वाजताच्या शोला सुद्धा प्रेक्षकांनी गर्दी केली होती. ‘देऊळ बंद २’ चित्रपटाला संपूर्ण महाराष्ट्रातून मिळणारा प्रतिसाद पाहून प्रवीण तरडेंसह सिनेमाची संपूर्ण टीम भारावून गेली आहे. त्यांनी कृतज्ञता व्यक्त करत सगळ्या प्रेक्षकांचे आभार मानले आहेत.
‘देऊळ बंद २’मध्ये स्नेहल तरडे आणि ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. वयाच्या ७५ व्या वर्षी मोहन जोशींनी खूप मेहनत घेऊन ही भूमिका साकारल्याचं प्रवीण तरडेंनी अनेक मुलाखतींमध्ये सांगितलं आहे. पहिल्या व दुसऱ्या भागाच्या यशानंतर आता प्रवीण तरडेंनी ‘देऊळ बंद’च्या तिसऱ्या भागाची घोषणाही केली आहे.
‘देऊळ बंद २’च्या बॉक्स ऑफिस कामगिरीबद्दल सांगायचं झालं, तर पहिल्या तीन दिवसांत या चित्रपटाने ११.३७ कोटींचा गल्ला जमावला. यानंतर रविवारी ‘देऊळ बंद २’च्या कलेक्शनमध्ये मोठी वाढ झाली. चौथ्या दिवशी रविवारी या चित्रपटाने ६.१० कोटी कमावले. पहिल्या चार दिवसांत मिळालेल्या प्रतिसादानंतर हा सिनेमा मंडे टेस्टमध्ये पास होणार का याकडे सर्वांचं लक्ष होतं. पाचव्या दिवशी म्हणजेच सोमवारी या सिनेमाने जवळपास ३.४० कोटी कमावल्याचं वृत्त सॅकनिल्कने दिलं आहे. यामुळे सिनेमाचं एकूण कलेक्शन २० कोटींच्या पार पोहोचलं आहे. त्यामुळे ‘देऊळ बंद २’ सिनेमावर ब्लॉकबस्टरची पाटी लागली आहे.
सिनेमाचं कलेक्शन शेअर करत प्रवीण तरडेंनी कॅप्शनमध्ये ‘स्वामींची कृपा’ म्हटलं आहे.
- पहिला दिवस ( गुरुवार ) – ३.०५ कोटी
- दुसरा दिवस ( शुक्रवार ) – ३.११ कोटी
- तिसरा दिवस ( शनिवार ) – ५.२१ कोटी
- चौथा दिवस ( रविवार ) – ६.१० कोटी
- पाचवा दिवस ( सोमवार ) – ३.७० कोटी*
- एकूण कलेक्शन – २१.१७ कोटी*
दरम्यान, ‘देऊळ बंद २’ चित्रपटात प्रवीण तरडे आणि त्यांची पत्नी स्नेहल तरडे, अतुल कुदळे, पिट्याभाई रमेश परदेशी, ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी, महेश मांजरेकर, ओम भूतकर, मंगेश देसाई, प्रसाद ओक, सविता मालपेकर, देवेंद्र गायकवाड, सुनील अभ्यंकर, जगन्नाथ निवंगुणे आणि संस्कृती बालगुडे हे कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकले आहेत. याशिवाय या सिनेमात गश्मीर महाजनीने शेवटी कॅमिओ केल्याचं पाहायला मिळत आहे.
