Deool Band 2 box office collection: देऊळ बंद हा सिनेमा प्रचंड गाजला. २०१५ मध्ये हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. सिनेमातील प्रत्येक पात्राचे, गोष्टीचे कौतुक झाले होते. नुकताच देऊळ बंद २ हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे.

सिनेमा प्रदर्शित होण्याआधीपासूनच देऊळ बंद २ ची सर्वत्र चर्चा सुरू होती. चित्रपटाच्या टीझर व ट्रेलरला प्रेक्षकांचे मोठ्या प्रमाणात प्रेम मिळाले. २१ मे २०२६ देऊळ बंद हा सिनेमा प्रदर्शित झाला. त्यानंतर सिनेमाला प्रेक्षकांचे मोठ्या प्रमाणात प्रेम मिळाल्याचे पाहायला मिळत आहे. आता तीन दिवसांत या सिनेमाने किती कमाई केली आहे, हे जाणून घेऊ…

‘देऊळ बंद २’ सिनेमाने ३ दिवसांत किती कोटींची कमाई केली?

प्रवीण तरडे यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे. नुकतीच त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये सिनेमाने कोणत्या दिवशी किती कमाई केली, याबद्दल लिहिले आहे. तर तीन दिवसांत एकूण किती कमाई केली हेही दिसत आहे.

पहिल्या दिवशी म्हणजेच गुरूवारी या सिनेमाने, ३.०५ कोटींची कमाई केली. दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी ३.११ कोटींची कमाई केली आहे आणि शनिवारी या सिनेमाने ५.२१ कोटींची कमाई केली आहे. तीन दिवसांत या सिनेमाने ११. ३७ कोटींची कमाई केली आहे.

प्रवीण तरडे यांच्या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. एकाने लिहिले, “सर अभिनंदन. खूप छान सिनेमा, छान लेखन, मांडणी आणि सर्वांचा अप्रतिम अभिनय आहे. वास्तववादी विषयांची सुंदर हाताळणी, पुढील वाटचालीस तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. ‘देऊळ बंद ३’ची वाट पाहतोय”, दुसऱ्याने लिहिले, “देऊळ बंद २ टीमचे खूप खूप अभिनंदन”, आणखी एकाने लिहिले, “हार्दिक अभिनंदन”, एकाने लिहिले,”अभिनंदन सर आपणास पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा”, एकाने लिहिले, “आज च कलेक्शन बघा सर. रविवार पूर्ण हाऊस फुल असणार आम्ही स्वतः १५ जण चित्रपट पाहायला जात आहोत”, एकाने लिहिले, “फक्त आता देऊळ बंद ३ लवकरात लवकर प्रदर्शित करा”, अशा अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहेत. सर्वजण देऊळ बंद २ च्या टीमवर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. आता आगामी काळात हा सिनेमा किती कमाई करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

प्रवीण तरडे दिग्दर्शित या सिनेमात शेतकऱ्याची गोष्ट पाहायला मिळते. अनेक लोकप्रिय कलाकार या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. महेश मांजरेकर, प्रसाद ओक, मंगेश देसाई, स्नेहल तरडे, ओम भुतकर हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. तसेच, देऊळ बंदमध्ये दिसलेला राघव शास्त्री म्हणजेच गश्मीर महाजनी देऊळ बंद २ मध्येदेखील दिसला आहे. मोहन जोशी यांनी या सिनेमांत स्वामी समर्थ ही भूमिका साकारली आहे. त्यांच्या भूमिकेला प्रेक्षकांचे प्रेम मिळत आहे.

दरम्यान, आता आगामी काळात देऊळ बंद २ हा सिनेमा किती कोटींची कमाई करणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.