कथाकथन शैली, दिग्दर्शनाचं तंत्र, प्रेक्षकवर्ग या आपल्या जमेच्या बाजू नेमक्या कशा आणि किती खंबीर आहेत याचं पुरेपूर भान असेल आणि त्या बळावर आपल्याला लोकांपर्यंत नेमकं काय पोहोचवायचं आहे, याची स्पष्टता असेल तर ठरवलेल्या मनोरंजनाच्या चौकटीत अचूक बसणारा चित्रपट कसा देता येतो, याचं उत्तम उदाहरण प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘देऊळबंद २’ आहे. दशकभरापूर्वी यशस्वी ठरलेल्या चित्रपटाचा सीक्वेलपट करताना संपूर्णपणे नवी कथा, व्यक्तिरेखा आणि दृष्टिकोनातून त्यांनी मांडणी केली आहे.

प्रवीण तरडे हे स्वत: शेतकरी आहेत, त्यामुळे शेतकर्‍यांची सद्य:स्थिती, त्यांच्यासमोरची आव्हाने, नैसर्गिक संकटांचं आभाळ अंगावर घेऊनच दरवेळी नव्याने मातीत काही रुजवू पाहणारा शेतकरी आर्थिक, सामाजिक, राजकीय अशा सगळ्याच बाजूंनी नाडला गेल्यावर कसा हतबल होतो, हे त्यांनी याचि देही याचि डोळा अनुभवलं आहे. आणि म्हणूनच ‘देऊळबंद २’मध्ये शेतकरी आत्महत्या हा विषय केंद्रस्थानी ठेऊन त्यांनी लिहिलेली कथा-पटकथा ही कुठेही वरवरची, कृत्रिम वाटत नाही.

आठ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘मुळशी पॅटर्न’मध्येही खचत चाललेला शेतकरी, त्यांच्या जमिनी कवडीमोल भावात विकत घेऊन विकासाच्या नावाखाली शेतकर्‍यांचा घास घेणारी बडी धेंडं हा विषय मांडतानाही त्यांनी कुठलीही कसर ठेवली नव्हती. ‘देऊळबंद २’मध्ये शेतकर्‍यांची होणारी फसवणूक, दलाल आणि अडत्यांची मुजोरी, बनावट खतं कीटकनाशक, सुमार दर्जाचं बी-बियाणं आणि सरकारी स्तरावर बुडत्या शेतकर्‍याला वरती येण्यासाठी हात देण्याऐवजी त्याला अधिकच असहाय्य करणारे अधिकारी या सगळ्या वास्तवाची मांडणी आहे. मात्र, या चित्रपटातला मुद्दा अधिक नाजूक विषयावर भाष्य करतो. अत्यंत प्रतिकूल अशा परिस्थितीतही आत्महत्या हे उत्तर असू शकत नाही, हे ठळकपणे जाणवून देतानाच अशा वेळी शेतकर्‍याला ज्या देवाचा आधार वाटतो त्याच्याच तोंडून हे सांगण्याचा प्रयत्न दिग्दर्शकाने केला आहे. 

‘देऊळबंद २’ची कथा खूप वेगळी आहे, अशातला भाग नाही. एरव्ही अभिनय, दिग्दर्शन सगळ्याच बाबतीत तडाखेबंद, आक्रमक शैलीसाठी तरडे प्रसिद्ध आहेत. आपली हीच शैली प्रेक्षकांना आवडते, याची त्यांना जाणीव आहे. त्यामुळे त्यांच्या मूळ शैलीशी त्यांनी फारकत घेतलेली नाही, पण नेहमीपेक्षा भिन्न दृष्टिकोनातून त्यांनी हा विषय मांडला आहे. एकतर इथे शेतकर्‍याची पत्नी परिस्थितीची सूत्रं हातात घेते. तिचा नवरा, सासू स्वामीभक्त आहेत. ती मात्र नास्तिक आहे, व्यवहाराने जगणारी आणि घरादारावर, आपल्या माणसांवर आत्यंतिक प्रेम करणारी अशी स्त्री आहे. कितीही कठीण परिस्थितीत नवर्‍याबरोबर कष्ट करून पुढे जायला पाहिजे इतकी धमक तिच्यात आहे.

अशी स्त्री जेव्हा कठीण समयी देवाला हाक मारेल तेव्हा ती त्याची विनवणी करणार नाही, ती त्याला जाबच विचारणार. या चित्रपटात संगीता पायगुडे (स्नेहल तरडे) वारुळावर दगड मारून स्वामींना बोलावून घेते. आपल्याबरोबर जे घडलं आहे ते का? न्यायाने वागूनही अन्याय पदरात पडण्यामागचं कारण काय? हे प्रश्न स्वामींना विचारते. आणि इथवरच थांबत नाही तर या परिस्थितीत सामान्य शेतकर्‍यासारखं जगून स्वामींनी मार्ग काढावा, असं आव्हान ती त्यांना देते. देवाने चमत्कार करून किंवा शक्तीचा उपयोग करून मार्ग काढायचा नाही, हे सुनावत ती देवाला परीक्षेला बसवते. या परीक्षेत काय होतं? स्वामी भक्ताच्या परीक्षेत उत्तीर्ण होतात का? इतक्या सरळ थेट पद्धतीने मांडणी करत लेखक झ्र् दिग्दर्शक म्हणून प्रवीण तरडे यांनी शेतकरी आत्महत्या विषयावरचे अनेक वास्तव पैलू समोर ठेवले आहेत.

या चित्रपटाची मांडणी करताना लेखकाचा वेगळा दृष्टिकोन महत्त्वाचा ठरला आहे. काय सांगायचं आहे आणि जे काही सांगायचं आहे ते रंजक, प्रेक्षक कुठेही कंटाळणार नाहीत अशाच पद्धतीने मांडायचं याबद्दलची त्यांची स्पष्टता चित्रपटभर दिसते. त्यामुळे चुरचुरीत संवादाची फोडणी, क्वचित भडक वाटेल असं भावनिक नाट्य, तरडेंच्याच चित्रपटात दिसणारे नेहमीचे कलाकार, खतरनाक… संगीत या सगळ्या मनोरंजनाच्या भक्कम चौकटीत त्यांनी मांडणी केली आहे, पण ते करत असताना अनेकदा अतिनाट्यात वाहवत जाण्याची भीती असते तिथे त्यांनी समतोलही साधला आहे. अर्थात, या विषयावरच्या उत्तरांचा शोध घेतानाची मांडणी ही बर्‍यापैकी वरवरची, आदर्शवत वाटावीत अशी आहेत. त्यामुळे त्यातला रंजकतेचा पैस अधिक आहे. या चित्रपटातल्या दोन मुख्य व्यक्तिरेखांनी संपूर्ण चित्रपट उचलून धरला आहे. स्नेहल तरडे यांनी साकारलेली संगीता आणि स्वामी समर्थांच्या भूमिकेतील मोहन जोशी यांच्यातल्या जुगलबंदीने खरी रंगत आणली आहे.

संगीताचं दु:ख, स्वामींना धारेवर धरताना नकळत मोठा होत गेलेला अहंकार, शेवटपर्यंत आपल्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्याची धडपड आणि निर्णय घेतल्यानंतर त्याचे भलेबुरे परिणाम स्वीकारण्याची तिची जिद्द सगळंच स्नेहल यांनी काया, वाचा, मने आत्यंतिक तडफेने रंगवलं आहे. स्वामींच्या असण्यापासून दिसण्यापर्यंत सगळ्याच बाबतीत मोहन जोशी ज्या सहजतेने वावरतात त्याला तोड नाही. या दोघांबरोबरच अनेक उत्तम कलाकार या चित्रपटात सुखद धक्का देतात. याशिवाय, चित्रपट सुंदर दिसावा यासाठी तरडेंनी सिनेमॅटोग्राफर प्रशांत मिसळे यांच्या मदतीने केलेले प्रयत्नही सार्थ ठरले आहेत. गोळीबंद मनोरंजन असलेला ‘देऊळबंद २’ हा चित्रपट अगदी शेवटच्या दृश्यचौकटीपर्यंत पाहिलात तर आणखी गंमत अनुभवता येईल.

दिग्दर्शक : प्रवीण तरडे

कलाकार : स्नेहल तरडे, मोहन जोशी, प्रवीण तरडे, संस्कृती बालगुडे, मंगेश देसाई, अतुल कुडले, ऋषीकेश वांबुरकर.