Deool Band 2 100 Crore Box Office Collection : प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘देऊळ बंद २’ हा सिनेमा २१ मे २०२६ ला प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली असून चित्रपटाची घोडदौड अजूनही सुरू आहे. ‘देऊळ बंद २’ चित्रपटाने १०० कोटींचा टप्पा पार केला आहे. मोजक्याच मराठी चित्रपटांना १०० कोटींचा टप्पा पार करण्यात यश आलेले असून या यादीमध्ये ‘देऊळ बंद २’ सिनेमाची वर्णी लागली आहे. सिनेमा प्रदर्शित होऊन ३९ दिवस झाले असून चित्रपटाचे शो हाऊसफुल्ल सुरू आहेत. अगदी रात्रीचे शो वाढवून चित्रपट पाहिला जात आहे. महाराष्ट्रातील शेतकरी आणि स्वामी समर्थ यांची भक्ती यांवर आधारित चित्रपटाला प्रेक्षकांकडून उदंड प्रतिसाद मिळाला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक प्रवीण तरडे व निर्माते स्वतः १०० कोटी पार केलेल्या शोसाठी उपस्थित राहिले असून त्यांनी प्रेक्षकांचे आभार मानले आहेत.
‘देऊळ बंद २’ सिनेमात स्नेहल तरडे, मोहन जोशी, अतुल कुडळे, प्रसाद ओक, ओम भूतकर, मंगेश देसाई, संस्कृती बालगुडे असे अनेक कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. या सिनेमाचे लेखन व दिग्दर्शन प्रवीण तरडे यांनी केले आहे. चित्रपटामध्ये स्वामी समर्थ यांची भक्ती आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची स्थिती याची सांगड घालण्यात आली असून हा सिनेमा प्रेक्षकांना भावला आहे. पहिल्या दिवसापासूनच चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळाला असून फक्त भारतामध्येच नाही तर परदेशातील मराठी प्रेक्षकांनी चित्रपटाला साथ दिली आहे.
प्रवीण तरडेंनी केली घोषणा
अवघ्या ८ ते १० कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या सिनेमाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर तब्बल १०० कोटींहून अधिक कमाई केली आहे. ‘देऊळ बंद २’ चित्रपटाने शंभर कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री घेताना प्रवीण तरडे हे स्वतः सिनेमागृहामध्ये हजर राहिले होते. त्यांनी प्रेक्षकांसह हा क्षण साजरा केला आहे. यावेळी त्यांनी चित्रपटाचा नफा गरजवंत मुलींच्या शिक्षणासाठी वापरला जाणार असल्याची घोषणा केली आहे.
‘देऊळ बंद २’ने केला १०० कोटींचा टप्पा पार
प्रवीण तरडे यांनी इन्स्टाग्रामवर या खास क्षणाचा व्हिडीओ शेअर केला आहे. रात्री ११ वाजता असलेल्या शोला त्यांनी स्वतः उपस्थित राहून ‘देऊळ बंद २’ चा आनंद साजरा केला. प्रवीण तरडे म्हणाले, ३९ व्या दिवसाचा आज शेवटचा शो आहे आणि हाच तो प्रेक्षकवर्ग आहे, ज्यांनी १०० कोटींची मोहर उमटवली आहे. आजही शो हाऊसफुल्ल आहे. ३९ व्या दिवशीसुद्धा पहिल्या रांगेतील एकही खुर्ची रिकामी नाही. पहिल्या रांगेपासून शेवटच्या रांगेपर्यंत प्रेक्षक बसलेले आहेत.” सिनेमाने १०० कोटींचा टप्पा पार करताच प्रवीण तरडे व प्रेक्षकांनी स्वामी समर्थांच्या नावाचा गजर केला. रात्री उशिराही प्रेक्षकांनी सिनेमाला दिलेला प्रतिसाद पाहून मराठी चित्रपटसृष्टीला पुन्हा एकदा सोन्याचे दिवस आल्याची प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिली आहे.
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला करणार मदत
‘देऊळ बंद २’ चित्रपटातून मिळालेला नफा समाजोपयोगी कार्यासाठी वापरण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील आणि गरजू विद्यार्थिनींच्या शिक्षणासाठी हा निधी खर्च केला जाणार आहे. दरम्यान, याची घोषणा पुन्हा एकदा प्रवीण तरडे यांनी केली आहे. १०० कोटींचा टप्पा पार करताना चित्रपटगृहामध्ये चित्रपटाचे निर्माते कैलाश वाणी आणि जयश्री वाणी उपस्थित होते. प्रवीण तरडे म्हणाले, चित्रपटातून मिळणारा नफा आत्महत्याग्रस्त कुटुंबातील मुलींच्या शिक्षणासाठी वापरण्याची संकल्पना जयश्री वाणी आणि जुईली वाणी यांची होती. या निधीतून मुलींचे शिक्षण, वाचनालयाची सुविधा आणि दोन वेळच्या जेवणाचा खर्च उचलला जाणार आहे. मराठवाडा आणि खान्देशमधून शिक्षणासाठी पुण्यात आलेल्या सुमारे २०० मुलींना आजपासून मदत करण्यास सुरुवात झाली आहे. त्यांच्या संपूर्ण शिक्षणकाळात दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था करण्यात येणार आहे.”
