Deool Band 2 : ‘देऊळ बंद’ या चित्रपटाचा पहिला भाग २०१५ मध्ये प्रदर्शित झाला होता. या सिनेमाला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं. आता जवळपास दहा वर्षांनी या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीच ‘देऊळ बंद २’चं पोस्टर लॉन्च करण्यात आलं होतं. आता या चित्रपटाचा जबरदस्त टीझर प्रदर्शित झाला आहे. येत्या २१ मे रोजी हा सिनेमा रिलीज होईल.

‘देऊळ बंद २’मध्ये पुन्हा एकदा ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी श्री स्वामी समर्थांची भूमिका साकारणार आहेत. तर त्यांच्या जोडीला अभिनेत्री स्नेहल तरडे मुख्य भूमिका साकारेल. ‘देऊळ बंद २ – आता परीक्षा देवाची’ यामध्ये कोणकोणते कलाकार झळकणार जाणून घेऊयात…

‘देऊळ बंद २’ चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन या सगळ्याची जबाबदारी प्रविण तरडेंनी सांभाळली आहे. कैलाश वाणी, जयश्री कैलाश वाणी, कैवल्य वाणी आणि जुईली वाणी- सूर्यवंशी यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे.

या सिनेमात प्रविण तरडे आणि त्यांची पत्नी स्नेहल तरडे, ‘लाखात एक आमचा दादा’ फेम शत्रू म्हणजेच अतुल कुदळे, पिट्याभाई रमेश परदेशी, ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी, महेश मांजरेकर, ओम भूतकर, मंगेश देसाई, प्रसाद ओक, सविता मालपेकर, देवेंद्र गायकवाड, जगन्नाथ निवंगुणे आणि संस्कृती बालगुडे हे कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत. या सगळ्या कलाकारांची झलक प्रेक्षकांना टीझरमध्ये पाहायला मिळत आहे. आता गश्मीर महाजनी या सिनेमात असणार की नाही याबद्दल प्रत्येकाच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. या टीझरच्या कमेंट्समध्येही चाहते गश्मीबद्दल विचारणा करत आहेत.

‘देऊळ बंद २’ मध्ये स्वामी एका गरीब महिलेच्या सामान्य दुचाकीवरून प्रवास करताना दिसत आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना या चित्रपटात एका सामान्य कुटुंबाची असामान्य गोष्ट पाहायला मिळेल. येत्या २१ मे रोजी हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित होईल.

या सिनेमाच्या टीझरवर चाहत्यांसह मराठी कलाकारांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. “मराठी सिनेमाचे सोनेरी दिवस तुम्हीच परत आणू शकता प्रविण सर”, “स्वामी हो…खूप शुभेच्छा”, “गश्मीर सिनेमात असेल का?”, “स्वामी महाराजांची कृपा खूप सुंदर टीझर”, “मनापासून बोलवलं की देव येतो..”, अशा प्रतिक्रिया टीझरवर आल्या आहेत.

दरम्यान, ‘देऊळ बंद २’ सिनेमाला आता प्रेक्षक कसा प्रतिसाद देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.