Deool Band 2 Pravin Tarde Ganpati Decoration Pune: लोकप्रिय दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्या ‘देऊळ बंद २’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर १०० कोटींहून अधिक रुपयांची कमाई केली. या सिनेमाची अजूनही प्रेक्षकांमध्ये चर्चा आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने पुन्हा एकदा ‘देऊळ बंद २’ सिनेमाची लोकप्रियता दिसून आली. पुण्यातील एका कुटुंबाने घरी बाप्पाची आरास ही ‘देऊळ बंद २’ सिनेमावर आधारित केली. प्रवीण तरडे यांनी स्वतः त्यांच्या घरी भेट देत, त्यांचे कौतुक केले आहे.

प्रवीण तरडे यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओत ते एका घरी गणरायाचे दर्शन घेण्यासाठी गेल्याचे दिसून येत आहे. पुण्यातील बावधनकर या कुटुंबाने ‘देऊळ बंद २’ सिनेमावर आधारित देखावा साकारला असून, प्रवीण तरडेंनी स्वतः त्यांच्या घरी भेट दिली आहे. गणरायाचे दर्शन घेत, त्यांनी कुटुंबाने साकारलेल्या देखाव्याचे कौतुक केले. विशेष म्हणजे या कुटुंबातील लहान मुलांनी व त्यांच्या आईने हाताने सर्व पात्रांच्या मूर्ती तयार करून, हा हलता देखावा उभा केला आहे.

‘देऊळ बंद २’ सिनेमाचा हुबेहुब साकारला देखावा

बावधनकर कुटुंबाच्या या देखाव्यामध्ये स्नेहल तरडेंनी साकारलेल्या संगीता पायगुडे या पात्राने दगड मारल्यानंतर वारुळातून बाहेर आलेले स्वामी समर्थ अगदी हुबेहूब साकारले आहेत. त्याचबरोबर शंकर महाराज, गजानन महाराज व स्वामी समर्थ यांच्या भूमिकांच्या प्रतिकृतीही साकारण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर प्रवीण तरडे यांनी साकारलेली सदुशेठ शिंदेची प्रतिकृतीसुद्धा साकारण्यात आली आहे. त्याबाबत प्रवीण तरडे म्हणाले, “देखाव्यामध्ये मीसुद्धा आहे. माझ्या मस्त मिशा व केस दाखवले आहेत.”

पुढे प्रवीण तरडे म्हणाले, “खरे तर या कलाकारांचे आभार मानले पाहिजेत की, त्यांनी त्यांच्या कलेतून संपूर्ण महाराष्ट्रात ‘देऊळ बंद २’चा विषय पोहोचवला. शिल्पा बावधनकर व त्यांचे पूर्ण कुटुंब हे काम करीत आहे. शिल्पाताईंचे खूप अभिनंदन! आणि हा त्यांचा व्यवसाय असून, या मूर्ती घडविण्यासाठी त्यांना महाराष्ट्र आणि जगभरातून मागण्या आल्या आहेत. त्यावरून घराघरांमध्ये ‘देऊळ बंद २’ किती पोहोचला आहे, हे लक्षात येते.”

दरम्यान, यावेळी अभिनेता रमेश परदेशी ऊर्फ पिट्याभाई उपस्थित असल्याचेही दिसून आले. प्रवीण तरडे यांनी हा देखावा साकारणाऱ्या कलाकारांचे खूप कौतुक केले आणि त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.