Deool Band 2 Collection Day 10 : प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘देऊळ बंद २’ सिनेमाची सध्या संपूर्ण जगभरात चर्चा सुरू आहे. हा सिनेमा २१ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. गेल्या दहा दिवसांत या मराठी सिनेमाने बॉक्स ऑफिसवर ऐतिहासिक कामगिरी करत ४० कोटींहून अधिक गल्ला जमावला आहे. त्यामुळे सध्या सर्व स्तरांतून प्रवीण तरडे अन् टीमचं भरभरून कौतुक करण्यात येत आहे.

या चित्रपटाने पहिल्या तीन दिवसांतच आपलं मूळ बजेट वसूल करत तब्बल ११.३७ कोटींचा गल्ला जमावला होता. चित्रपटाची पहिल्या आठ दिवसांची कमाई तब्बल ३२.८२ कोटी इतकी आहे. ही आकडेवारी स्वत: दिग्दर्शक प्रवीण तरडेंनी शेअर केली आहे. ‘देऊळ बंद २’च्या कलेक्शनमध्ये दुसऱ्या शनिवारी म्हणजेच १० व्या दिवशी मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. या सिनेमाने दहाव्या दिवशी ५ कोटींहून अधिक कमाई केली आहे.

त्यामुळे ‘देऊळ बंद २’चं दहा दिवसांचं एकूण कलेक्शन ४० कोटींच्या पुढे जाऊन पोहोचलं आहे, अशी माहिती सॅकनिल्कने दिली आहे. या सिनेमाचे मध्यरात्रीचे शो सुद्धा हाऊसफुल्ल सुरू आहे. प्रवीण तरडेंनी नुकतीच साताऱ्यातील सिटी प्राइड थिएटरला भेट दिली होती. यावेळी त्यांनी मध्यरात्रीचा शो हाऊसफुल्ल असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता.

‘देऊळ बंद २’ सिनेमाचं एकूण कलेक्शन

  • आठ दिवसांचं एकूण कलेक्शन – ३२.८२ कोटी
  • ९ वा दिवस ( दुसरा शुक्रवार ) – ३.१० कोटी*
  • १० वा दिवस ( दुसरा शनिवार ) – ५ कोटी*
  • ‘देऊळ बंद २’ सिनेमाचं एकूण कलेक्शन – ४०.९२ कोटी*

मीडिया रिपोर्ट्सनुसार ‘देऊळ बंद २’ सिनेमाचं मूळ बजेट जवळपास ८ ते १० कोटी असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे सिनेमाच्या कलेक्शनची आकडेवारी पाहता, मूळ बजेटपेक्षा चारपट कमाई करून आता ‘देऊळ बंद २’ सिनेमावर ब्लॉकबस्टरची पाटी लागली आहे.

दरम्यान, ‘देऊळ बंद २’ चित्रपटात स्नेहल तरडे आणि मोहन जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. त्यांच्यासह या सिनेमात ओम भूतकर, प्रसाद ओक, रमेश परदेशी, महेश मांजरेकर, संस्कृती बालगुडे या कलाकारांनी देखील महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.