Deool Band 2 Release Date: सध्या अनेक उत्तमोत्तम मराठी सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. निर्मिती सावंत, विदुला चौगुले आणि ललित प्रभाकर यांची प्रमुख भूमिका असलेला सुपर डुपर आणि पूजा सावंत, प्रार्थना बेहेरे व अभिजीत खांडकेकर यांची प्रमुख भूमिका असलेला सखे गं साजनी हे दोन्ही चित्रपट (३ एप्रिल २०२६)ला प्रदर्शित झाले आहेत.
आता या चित्रपटांबरोबरच आणखी एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाची गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षक वाट पाहत आहे. हा सिनेमा म्हणजे देऊळ बंद २ हा आहे. प्रवीण तरडे दिग्दर्शित हा सिनेमा कधी प्रदर्शित होणार, हे जाणून घेऊ…
देऊळ बंद २ या सिनेमाचे शूटिंग सुरू असल्याचे काही दिवसांपूर्वी समोर आले होते. आता प्रवीण तरडे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चित्रपट कधी प्रदर्शित होणार आहे, याबद्दल खुलासा केला आहे.
प्रवीण तरडेंचा ‘देऊळ बंद २’ सिनेमा कधी प्रदर्शित होणार?
प्रवीण तरडे यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला. हा व्हिडीओ शेअर करत त्यांनी लिहिले, “यंदा स्वामी शुक्रवारी नाही गुरुवारीच येणार.”
पुढे त्यांनी लिहिले, “राघव शास्त्रीला भेटायला ११ वर्षांपूर्वी स्वामी आले होते. आता पुन्हा येणार आहेत. पण कोणासाठी..? का..? आणि कधी..? त्याचीच ही तारीख . गुरूवार २१ मे २०२६ .” तसेच, व्हिडीओमध्ये शेवटी पाहायला मिळते की देऊळ बंद २, आता परीक्षा देवाची असे लिहिले आहे. कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन याची जबाबदारी प्रवीण तरडे यांनी घेतली आहे.
प्रवीण तरडे यांनी शेअर केलेल्या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट्स करत श्री स्वामी समर्थ असे लिहिले आहे. तर अनेकांनी सिनेमा पाहण्यासाठी आतुर असल्याचे लिहिले आहे. याबरोबरच, अनेकांनी प्रवीण तरडे यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
प्रवीण तरडे यांचे नाव अभिनयाबरोबरच दिग्दर्शन क्षेत्रातही घेतले जाते. २०१५ ला त्यांचा देऊळ बंद हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. यामध्ये गश्मीर महाजनी प्रमुख भूमिकेत दिसला होता. देऊळ बंद सिनेमाला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळाली होती. त्यानंतर मुळशी पॅटर्न, सरसेनापती हंबीरराव, धर्मवीर, धर्मवीर २ हे सिनेमेदेखील प्रचंड गाजले. आता देऊळ बंद २ या सिनेमाबद्दल सर्वांनाच उत्सुकता लागली असल्याचे पाहायला मिळत आहे.
