प्रविण तरडे दिग्दर्शित ‘देऊळ बंद २’ सिनेमाची गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा सुरू आहे. हा चित्रपट २१ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. पहिल्याच वीकेंडला ‘देऊळ बंद २’ने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केल्याचं पाहायला मिळालं. यानंतर सिनेमा प्रदर्शित झाल्यावर अकराव्या दिवशी ‘देऊळ बंद २’ने मोठी झेप घेतली. बॉक्स ऑफिसवर ५० कोटींचा टप्पा पार करत ‘देऊळ बंद २’ने इतिहास रचला.
‘देऊळ बंद २’ प्रदर्शित होऊन आता जवळपास १५- १६ दिवस उलटले आहेत. तरीही संपूर्ण महाराष्ट्रात या चित्रपटाला तुफान प्रतिसाद मिळतोय. बऱ्याच शहरात हाऊसफुल्ल शो सुरू आहेत. इतकंच नव्हे तर काही ठिकाणी मध्यरात्रीचे शो सुद्धा हाऊसफुल्ल आहेत. याबाबत स्वत: प्रविण तरडेंनी माहिती दिली होती. एकंदर सध्या संपूर्ण कलाविश्वातून ‘देऊळ बंद २’च्या टीमवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. अशातच या चित्रपटासंदर्भातील आणखी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.
‘देऊळ बंद २’च्या संपूर्ण टीमने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली आहे. मुख्यमंत्र्यांनी या भेटीदरम्यानचे काही फोटो शेअर केले आहेत. “देऊळ बंद २’ चित्रपटाच्या टीमने आज सदिच्छा भेट घेतली. या उत्कृष्ट कलाकृतीसाठी दिग्दर्शक प्रविण तरडे आणि संपूर्ण टीमचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!” अशी पोस्ट शेअर करत मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण टीमचं या यशाबद्दल कौतुक केलं आहे.
याशिवाय मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यावर प्रविण तरडेंच्या पत्नी स्नेहल तरडेंनी सुद्धा खास पोस्ट शेअर केली आहे. त्या म्हणतात, “देऊळ बंद २’ या चित्रपटाच्या टीमची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सुहृद्य भेट झाली. या प्रसंगी माननीय मुख्यमंत्री साहेबांनी चित्रपटातील कलाकार आणि तंत्रज्ञांशी गप्पा मारल्या. तसेच चित्रपटाच्या यशाबद्दल सर्वांचं अभिनंदन केलं. साहेब, या सुंदर भेटीसाठी तुमचे मनःपूर्वक आभार! श्री स्वामी समर्थ!” अशा भावना व्यक्त करत स्नेहल तरडेंनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत.
दरम्यान, ‘देऊळ बंद २’मध्ये लोकप्रिय ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी आणि अभिनेत्री स्नेहल तरडे यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. यासह या सिनेमात प्रसाद ओक, ओम भूतकर, रमेश परदेशी, संस्कृती बालगुडे, महेश मांजरेकर अशा दमदार कलाकारांची मांदियाळी आहे.
