Deool Band 2 Teaser Release: काही सिनेमे वर्षानुवर्षे प्रेक्षकांच्या लक्षात राहतात. यापैकीच एक सिनेमा म्हणजे देऊळ बंद हा आहे. २०१५ मध्ये प्रदर्शित झालेल्या देऊळ बंद सिनेमाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. या सिनेमाची गोष्ट, कलाकारांचा अभिनय, दिग्दर्शन अशा सर्व गोष्टींमुळे देऊळ बंदची लोकप्रियता आजही कमी झालेली नाही.

आता देऊळ बंद २- आता परीक्षा देवाची हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून देऊळ बंद २ ची चर्चा सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. आता सिनेमाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आहे.

‘देऊळ बंद २’चा जबरदस्त टीझर प्रदर्शित

टीझरच्या सुरुवातीला शांत नदी दिसत आहे. नदीच्या काठावर एका दगडावर एक स्त्री पाठमोरी बसली आहे. तिच्यापुढे वटवृक्ष आहे. त्याखाली वारूळ आहे. त्या महिलेच्या डोळ्यांतून अश्रू वाहत आहेत. तिच्या हातात दगड आहे. तिथे उभा असलेला एक माणूस म्हणतो, स्वामी इथे येतील का? तेथील माणसांपैकी एक जण म्हणतो की, मनापासून बोलावलं की देव येतो, असं म्हणतात. ती स्त्री म्हणते, “वारुळात बसून बसून याला कंटाळा आला की हा दगड माणसाची परीक्षा घ्यायला येतो.”

त्यानंतर ती वारुळावर दगड भिरकावते. दगड फेकल्यानंतर वीज चमकते. स्वामी समर्थ प्रकट होतात. ते त्या स्त्रीला म्हणतात, “आज महाराज शोधत फिरण्याची वेळ तुझ्यासारख्या नास्तिक बाईवर कशी काय आली?” त्यावर ती स्त्री म्हणते, “माझ्या आस्तिक नवऱ्यामुळे. काय आहे की, काल आमच्यात थोडा वाद झाला होता. तो तुमच्या देवळाला कुलूप लावून चावी बरोबर घेऊन गेला आहे.” त्यावर स्वामी समर्थ म्हणतात, “अरे बापरे, इथेही देऊळ बंदच का?” दरम्यानच्या काळात अनेक गोष्टी घडतात.

टीझरमध्ये पुढे पाहायला मिळते की ती स्त्री गाडी चालवते, तिच्या मागे स्वामी समर्थ बसले आहेत. ते तिला म्हणते, “अगं ए नास्तिके, प्रत्येक युगात तुझ्यासारखे कित्येक रावण आणि कित्येक दुर्योधन पाहिले आहेत मी, देवाची परीक्षा पाहणारे”, त्यावर ती स्त्री गंभीर आवाजात म्हणते, “लिहून देते, शेतकरी पाहिला नसेल.”

पुढे ती स्त्री निघून जा असे ओरडत असल्याचे दिसत आहे. त्यावर स्वामी समर्थ म्हणतात, “तू मला परीक्षेला बसवलं आहेस ना? आता परीक्षा दिल्याशिवाय मी जाणार नाही. आता परीक्षा देवाची.”

स्वामी समर्थांना आव्हान देणारी स्त्रीची भूमिका स्नेहल तरडेंनी साकारली आहे. तर, मोहन जोशी स्वामी समर्थांच्या भूमिकेत दिसत आहे. हा टीझर सर्वांचे लक्ष वेधून घेत असल्याचे पाहायला मिळत आहे. यामध्ये स्नेहल तरडे मोहन जोशी यांच्याबरोबर प्रवीण तरडे, प्रसाद ओक, अतुल कुडाळे, ओम भूतकर, महेश मांजरेकर, मंगेश देसाई, पिट्या भाई, संस्कृती बालगुडे असे अनेक कलाकार दिसत आहे.

सिनेमाचे लेखन, दिग्दर्शन प्रवीण तरडे यांनी केले आहे. हा सिनेमा २१ मे २०२६ ला प्रदर्शित होणार आहे.