Deol Band Fame Actress : असे अनेक कलाकार आहेत जे लहानपणापासून इंडस्ट्रीत सक्रिय आहेत आणि त्यांनी आतापर्यंत अनेक कलाकृतींमध्ये काम करत त्यांच्या निरागस अभिनयाने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. यापैकीच एक म्हणजे ‘देऊळ बंद’ फेम अभिनेत्री आर्या घारे. प्रवीण तरडे यांच्या या चित्रपटातून घराघरात पोहोचलेली आर्या आता पुन्हा चर्चेत आलीये.
‘देऊळ बंद’मध्ये अभिनेता गश्मीर महाजनी मुख्य भूमिकेत होता. तर आर्यने त्याच्या ऑनस्क्रीन लेकीची सनाची भूमिका साकारली होती. त्यावेळी आर्याच्या कामाचं अनेकांनी कौतुक केलं होतं. तिचे सीन आणि संवाद आजही सोशल मीडियावर पाहायला मिळतात. अशातच आता तिने ती सध्या काय करत आहे, तिचं शिक्षण आणि अभिनय क्षेत्र या सगळ्याबद्दल सांगितलं आहे.
आर्या घारेचं शिक्षण किती?
राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत तिने याबद्दल सांगितलं आहे. आर्या म्हणाली, “मी सध्या लॉ(Law) करत आहे. मला एमबीबीएस करायचं होतं. मी सायन्सची विद्यार्थीनी आहे. पण, अभिनय आणि अभ्यास यांचा एकत्र समतोल साधनं कठीण झालं असतं कारण त्यासाठी खूपच अभ्यास करावा लागतो. आईसुद्धा म्हणाली तुला जमणार आहे का बघ दोन्ही एकत्र. म्हणून मी वकिलीचं शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला. मी मुद्देसुद सविस्तर चर्चा करू शकते, गरज पडल्यास भांडूही शकते असं वाटतं म्हणून हा निर्णय घेतला.”
आर्याने यावेळी ती प्रवीण तरडे यांना गुरू मानते आणि त्यांच्यामुळे तिला खूप काही शिकायला मिळालं, ओळख मिळाली असं तिने यावेळी सांगितलं आहे. शिवाय गश्मीर महाजनीबरोबरच काम करण्याचा अनुभव सांगत तिने त्याचही कौतुक केलं. आर्याने यावेळी ‘देऊळ बंद’ दरम्यानचा गश्मीरबरोबरचा एका किस्सा सांगितला आहे. गश्मीर आणि आर्या यांचा चित्रपटात एक सीन होता जो खूप व्हायरल झाला होता. त्यामध्ये आर्या गश्मीरच्या कंप्युटरची बटनं दाबते ज्यामुळे ते अनलॉक होतं आणि तिने कोणती बटनं दाबली याबद्दल तिलाही माहिती नसते ज्यामुळे गश्मीर तिला ओरडतो. त्या सीनमध्ये ती रडताना दिसते. पण त्यावेळी ती खरोखर रडली होती असं तिने सांगितलं आहे.
त्या सीनबद्दल आर्या म्हणाली, “मला सांगितलेलं की तुला बटन वगैरे दाबायचं आहे. मग तो येइल आणि तुला थोडासा रागवेल. आता थोडासा सांगितलं होतं. त्यानंतर मग तू सॉरी डॅडा असं बोल संपला सीन असं म्हणाले होते.”त्या सीनबद्दल ती पुढे म्हणाली, “मग मी बटन दाबलं त्यानंतर पहिलं बटन कोणतं दाबलंस वगैरे संवाद झाले तो आला. तेव्हा तो खूपच रागावला माझ्यावर. मी तेव्हा खरोखर घाबरले होते तिथेच खु्र्चीवर घाबरुन बसले. जेव्हा आम्ही थिएटरमध्ये जायचो तेव्हा सगळे म्हणायचे की किती भारी अभिनय केला आहे. पण त्या सीनमध्ये मी खरोखर रडले होते. मी घाबरुन रडले होते. त्यानंतर मी चार दिवस गश्मीर दादाबरोबर बोलत नव्हते. मी त्याला म्हटलं थोडसं रागवायचं होतं तू इतका का रागवलास? त्यावर तो म्हणाला तो सीन होता. सॉरी पोपो. तो मला पोपो बोलायचा ते चांगलं वाटायचं त्यामुळे प्रवीण सर म्हणाले चित्रपटातही बोल. त्यामुळे काही ठिकाणी तो मला चित्रपटातही पोपोच बोलला आहे.”
