प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘देऊळ बंद’ या चित्रपटाला प्रदर्शित होऊन जवळपास १० वर्षे झाली आहेत. ३१ जुलै २०१५ रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अभिनेता गश्मीर महाजनी मुख्य भूमिकेत झळकला होता. त्याच्यासह चित्रपटात अभिनेत्री निवेदिता सराफ, मोहन जोशी, श्वेता शिंदे. गिरिजा जोशी, प्रवीण तरडे हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकांत पाहायला मिळाले होते. तर या कलाकारांसह चित्रपटात एक बालकलाकारही पाहायला मिळाली होती.
‘देऊळ बंद’ चित्रपटात गश्मीरनं राघव शास्त्री नावाच्या वैज्ञानिकाची भूमिका साकारली होती. त्यामध्ये त्याची पत्नी, मुलगी व आई, असं कुटुंब पाहायला मिळालं होतं. चित्रपटात त्याची मुलगी सना ही पासवर्ड विसरते आणि त्यानंतर कथानकामध्ये मोठं वळण येतं, असं पाहायला मिळालं होतं आणि म्हणूनच या एका सीनमुळे सना हे पात्र प्रेक्षक आजही विसरलेले नाहीत. चित्रपटात सनाची भूमिका अभिनेत्री आर्या घारेने साकारली होती. आता ही सना बरीच मोठी झाली आहे. पण, सना म्हणजे अभिनेत्री आर्या घारे सध्या काय करतेय हे तुम्हाला माहिती आहे का?
अभिनेत्री आर्या घारे हिने आजवर ‘देऊळ बंद’, ‘बंदी शाळा’ यांसारख्या चित्रपटात काम केलं आहे; तर नुकतीच ती ‘सोनी मराठी’ वाहिनीवरील ‘गाथा नवनाथांची’ या मालिकेत झळकली होती. आर्या अभिनय क्षेत्रात काम करीत तिचं स्वत:चं वेगळं स्थान निर्माण करू पाहत आहे. आर्यानं आजवर गश्मीर महाजनी, प्रवीण तरडे, निवेदिता सराफ,मुक्ता बर्वे यांसारख्या अनेक दिग्गज कलाकारांसह काम केलं आहे.
आर्या अभिनयासह सोशल मीडियावरही बरीच सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. सोशल मीडियावर तिचे अनेक फोटो पोस्ट करीत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. तर तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर तिने ‘देऊळ बंद’ या चित्रपटातील कलाकारांसह अनेक जुन्या आठवणी शेअर केल्याचे पाहायला मिळते.
‘देऊळ बंद’ हा चित्रपट आजही तितक्याच आवडीनं पाहिला जातो. प्रवीण तरडे यांनी दिग्दर्शित केलेला हा त्यांचा पहिलाच चित्रपट आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यामधील काही सीनचे रील्स आजही सोशल मीडियावर पाहायला मिळतात.
दरम्यान, चित्रपटाचा पुढचा भाग कधी येणार याची प्रेक्षक वाट पाहत होते. काही दिवसांपूर्वीच चित्रपटाचे दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची घोषणा केली होती. ‘देऊळ बंद -आता परीक्षा देवाची’, असं या आगामी चित्रपटाचं नाव असणार आहे. तर हा चित्रपट शेतकऱ्यांच्या विषयावर आधारित आहे. परंतु, या आगामी चित्रपटात कोणते कलाकार पाहायला मिळतील याची अधिकृत घोषणा चित्रपटाच्या निर्मात्यांनी केलेली नाही.