Deolband Movie : ‘देऊळ बंद २’ या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. प्रेक्षक सिनेमा पाहण्यासाठी चित्रपटगृहात गर्दी करत आहेत. प्रवीण तरडे दिग्दर्शित या चित्रपटाच्या पहिल्या भागालाही प्रचंड चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्या चित्रपटाची क्रेझ आजही कायम आहे. अजूनही त्यातील पात्र प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहेत. त्यापैकीच काही म्हणजे गश्मीर महाजनीने साकारलेलं राघव शास्त्री हे पात्र आणि आर्या घारेने साकारलेली सना ही भूमिका.
आता पहिला भाग प्रदर्शित होऊन एक दशक झाल्यानंतर या चित्रपटाचा दुसरा भाग प्रदर्शित झाला आहे, पण यामध्ये गश्मीर आणि आर्या या ऑनस्क्रीन बाप-लेकीची जोडी पाहायला मिळत नाहीये. मात्र, पहिल्या भागात गश्मीरच्या लेकीची भूमिका साकारलेली अभिनेत्री आर्या घारे आता खूप मोठी झाली आहे आणि त्या चित्रपटानंतर तिने अनेक चित्रपट, मालिकांमध्ये काम केलं आहे.
आर्या घारे खऱ्या अर्थना प्रसिद्धीझोतात आली ते प्रवीण तरडे व गश्मीर महाजनी यांच्या ‘देऊळ बंद’ या चित्रपटामुळेच यातील तिचे सीन, संवाद अजूनही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत आणि ते सोशल मीडियावर पाहायला मिळत असतात. अशातच आता तिने या चित्रपटाच्या शूटिंगचा एक किस्सा सांगितला आहे. आर्या घारेने ‘देऊळ बंद’च्या शूटिंगदरम्यान ती चार दिवस गश्मीरवर रागावली होती आणि त्याच्याशी बोलत नव्हती असं म्हटलं आहे.
‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली, “प्रवीण सर माझ्याकडून खूप रिहर्सल करुन घ्यायचे. त्यामुळे मी कॅमेऱ्यासमोर अभिनय करु शकले.” राघव शास्त्रीची लेक चित्रपटात त्याच्या कंप्युटरचा पासवर्ड विसरते तेव्हा तो तिच्यावर ओरडतो हा सीसुद्धा प्रेक्षकांना खूप आवडलेला. यामधील त्यावेळी अवघ्या लहान वयात आर्याने इतका चांगला अभिनय कसा केला असेही प्रश्न तिला विचारले जातात असंही तिने यावेळी सांगितलं आहे. त्या सीनबद्दल आर्या म्हणाली, “मला सांगितलेलं की तुला बटन वगैरे दाबायचं आहे. मग तो येइल आणि तुला थोडासा रागवेल. आता थोडासा सांगितलं होतं. त्यानंतर मग तू सॉरी डॅडा असं बोल संपला सीन असं म्हणाले होते.”
गश्मीरवर रागावलेली आर्या
त्या सीनबद्दल ती पुढे म्हणाली, “मग मी बटन दाबलं त्यानंतर पहिलं बटन कोणतं दाबलंस वगैरे संवाद झाले तो आला. तेव्हा तो खूपच रागावला माझ्यावर. मी तेव्हा खरोखर घाबरले होते तिथेच खु्र्चीवर घाबरुन बसले. जेव्हा आम्ही थिएटरमध्ये जायचो तेव्हा सगळे म्हणायचे की किती भारी अभिनय केला आहे. पण त्या सीनमध्ये मी खरोखर रडले होते. मी घाबरुन रडले होते. त्यानंतर मी चार दिवस गश्मीर दादाबरोबर बोलत नव्हते. मी त्याला म्हटलं थोडसं रागवायचं होतं तू इतका का रागवलास? त्यावर तो म्हणाला तो सीन होता. सॉरी पोपो. तो मला पोपो बोलायचा ते चांगलं वाटायचं त्यामुळे प्रवीण सर म्हणाले चित्रपटातही बोल. त्यामुळे काही ठिकाणी तो मला चित्रपटातही पोपोच बोलला आहे.”
