ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांचं प्रदीर्घ आजाराने निधन झालं आहे. त्या ९४ वर्षांच्या होत्या. दादर येथील शुश्रूषा रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र उपचारांदरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली. सुलोचनादीदींच्या निधनानंतर सगळ्या स्तरांतून शोक व्यक्त करण्यात येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सुलोचना दीदी यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आज (५ मे) रोजी सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत प्रभादेवी येथील घरी सुलोचना दीदी यांचं पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आलं आहे. तसेच सायंकाळी पाच वाजता शिवाजी पार्क स्मशानभूमीत सुलोचना दीदी यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. कलाकारांसह अनेक नेते मंडळीं सुलोचना दीदींच्या पार्थिवाच्या अंतिम दर्शनासाठी त्यांच्या घरी दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्नी शर्मिला ठाकरेंसह सुलोचना दीदींच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतलं आहे.

आणखी वाचा : चित्रपटसृष्टीतील एका पर्वाचा अंत, ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदींचं निधन

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना सुलोचना दीदी यांच्याबद्दल मनातील भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, “चित्रपटसृष्टीमध्ये काही नावे अशी आहेत जी त्यांच्या कार्यामुळे आणि कर्तृत्वामुळे अजरामर आहेत. चित्रपटसृष्टीत त्यांच्या नावाबद्दल आदर आहे अशाच एक सुलोचना दीदी होत्या. सुरुवातीच्या काळात नायिकांच्या भूमिका करताना पुढे त्या आईच्या भूमिका साकारल लागल्या त्या अधिक लोकप्रिय झाल्या. माझ्या पिढीने त्यांना आईच्या रुपात पाहिलं. ज्यांच्याकडे पाहिल्यानंतर ममत्व वाटावं असं त्यांचे व्यक्तीमत्व होते. दादासाहेब फाळके पुरस्कार त्यांना मिळण्यासाठी त्या शंभर टक्के पात्र होत्या.”

सुलोचना दीदींच्या निधनाची बातमी कळताच कलाकारांसह अनेक राजकीय नेत्यांनी हळहळ व्यक्त केली होती. अनेकांनी ट्वीट करत सुलोचना दीदींना श्रद्धांजली वाहिली होती.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Deputy chief minister devendra fadanvis speaks about veteran actress sulochana didi avn
First published on: 05-06-2023 at 13:37 IST