Devdatta Nage David Warner : मराठी प्रेक्षकांच्या मनात खंडोबाचे रूप पडद्यावर साकारून विशेष स्थान निर्माण करणारा अभिनेता देवदत्त नागे आजही त्याच्या या भूमिकेमुळे ओळखला जातो. त्याने अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये प्रभावी भूमिका साकारल्या आहेत. तसेच दाक्षिणात्य चित्रपटांमध्येही तो झळकला आहे. मात्र ‘जय मल्हार’ मालिकेतील मार्तंड खंडोबाच्या भूमिकेने त्याला घराघरात लोकप्रियता मिळवून दिली. आजही खंडोबावरील त्याची श्रद्धा कायम असल्याचे दिसून येते. नुकत्याच एका मुलाखतीत देवदत्तने ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नर याला भंडारा लावल्याचा किस्सा शेअर केला आहे.

‘लोकशाही मराठी’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये, देवदत्त नागे याने मनोरंजन विश्वातील अनुभव सांगितले आहेत. तसेच मार्तंड खंडोबाच्या भूमिकेमुळे त्याला आजही मिळणारे प्रेक्षकांचे प्रेम याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. देवदत्त नागे म्हणाला, ” ‘जय मल्हार’ मालिका माझ्या आयुष्यातील एक टर्निंग पॉईंट ठरला आणि माझं पूर्ण आयुष्यच बदलून टाकलं. खंडेरायांप्रति आणि महादेवांप्रति एक वेगळीच भावना आहे आणि ती कदाचित सार्थकी लागली. अजूनही या मालिकेचे काही रेकॉर्ड ब्रेक झालेले नाहीत. अजूनही लोकांचे तेच प्रेम असून, तिची लोकप्रियता कायम आहे. त्यामुळे रोज भंडारा लावतो आणि ही फक्त कृतज्ञता आहे. मालिकेच्या शूटिंगवेळी जो भंडारा लावत होतो तो, जेजुरीच्या शिवलिंगावरचा भंडारा असायचा.”

पौराणिक मालिका करायची नव्हती पण… – देवदत्त

पुढे तो म्हणाला, “परमेश्वराचं स्वरूप साकारत होतो आणि त्यामुळे त्याची अशी एक गोष्ट, जी माझ्यासह सतत कशी राहील, याचा विचार करत होतो. त्यामुळे भंडारा लावतो. कारण- भंडारा एक अशी गोष्ट आहे, जी सतत माझ्या माथी लावू शकतो. जेव्हा शूटिंग असायचं, त्याची सुरुवात ही भंडारा लावूनच होत असे. आणि ती अशी कोणतीही हळद नाही, तर जेजुरीवरून आणलेल्या त्या द्विशिवलिंगावरील तो भंडारा असायचा. पौराणिक मालिका करण्यासाठी आधी माझा नकार होता; मात्र दिग्दर्शक महेश कोठारेंनी बोलावल्यानंतर नाही म्हणू शकलो नाही. पण, कधी कधी आपण एखादी गोष्ट करण्यासाठी नकार देत असतो आणि तरीही ती घडत असते. तेव्हा परमेश्वराची भावना वेगळी असते आणि त्याचा खेळ वेगळा असतो. तेव्हापासून मी परमेश्वरावर अवलंबून राहू लागलो.”

प्रेक्षक भावनिक होऊन पाया पडायला येतात पण…

देवदत्त नागे याने खंडेरायांची भूमिका प्रभावीपणे साकारल्याने प्रेक्षकांचे त्याच्याशी भावनिक नाते जुळले होते. यावेळी काही प्रेक्षक त्याच्या पाया पडण्यासाठी येत असल्याचा अनुभव देवदत्तने शेअर केला. तो म्हणाला, “लोक पाया पडायला येतात; पण त्यांना तसे करू देत नाही. ते वाकून नमस्कार करायला लागले की, मी त्यांच्या पाया पडतो आणि त्यांना पाया पडू नका हे सांगत असतो. मी एक साधा माणूस आहे. त्यामुळे खंडेरायाच्या पाया पडायचे असेल, तर जेजुरीच्या दिशेने हात जोडा, तुमचा नमस्कार देवापर्यंत जाईल. मी कोणलाच अगदी लहान मुलांनाही पाया पडू देत नाही. तेवढे मोठे आपण नसतो. त्यांच्या भावना असतात; पण त्यांना मिठी मारतो, पण पाया पडू देत नाही,”

देवदत्त नाग याने डेव्हिड वॉर्नरला लावला होता भंडारा

पुढे देवदत्त नागे याने ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नर याला भंडारा लावल्याचा किस्सा सांगितला. तो म्हणाला, “आम्ही मेलबर्नला शूट करत होतो. कुठेही असो मी सकाळी आवरलं की, आधी भंडारा लावतो. शूटिंगसाठी सेटवर गेलो, तर तिथे सगळे कॉफी पीत बसले होते. त्यावेळी तिथे डेव्हिड वॉर्नर होता. माझ्या कपाळावर भंडारा पाहून त्याने, ही हळद आहे का? (इज दिस टर्मरिक) असे विचारले होते. त्यावर नाही ही हळद नाही, तर हा भंडारा आहे, असे सांगितले होते. तेव्हा त्याच्याकडून ‘यळकोट यळकोट जय मल्हार’, असे म्हणून घेतले. तोडकं मोडकं का होईना; पण तोसुद्धा बोलला. खंडोरायांची ही कृपा की मेलबर्नमध्येसुद्धा तिकडचा माणूस ‘जय मल्हार’ म्हणू शकतो.”

देवदत्त नागेचा ‘घुबाडकुंड’ चित्रपट प्रदर्शित

अभिनेता देवदत्त नागे याने अनेक मराठी, हिंदी व दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. सुरुवातीला त्याने ‘देवयानी’ मालिकेमध्ये भूमिका साकारली होती. पण झी मराठीवरील ‘जय मल्हार’ मालिकेतील खंडेरायाच्या भूमिकेने त्याला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. त्यानंतर त्याने बॉलीवूडमध्ये ‘तानाजी’ व ‘आदिपुरुष’ या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. तसेच त्याने दाक्षिणात्य सिनेविश्वातील ‘रॉबिनहूड’ चित्रपटामध्ये भूमिका साकारली होती. त्याच चित्रपटामध्ये क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नर झळकला होता. त्याचा नुकताच ‘घबाडकुंड’ चित्रपट प्रदर्शित झाला आहे.