अभिनेता जितेंद्र जोशीनं त्याच्या दमदार अभिनय कौशल्याची कमाल नाटक, टीव्ही, चित्रपट आणि वेब सीरिजमध्येही पाहायला मिळत आहे. कान्स या आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये आपलं स्थान मिळवणारा जितेंद्र जोशी निर्मित ‘गोदावरी’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. येत्या ११ नोव्हेंबरला हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात जितेंद्र जोशी हा प्रमुख भूमिका साकारत आहे. नुकतंच या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर, नरिमन पॉईंट या ठिकाणी देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत गोदावरी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. या कार्यक्रमात या चित्रपटाच्या ट्रेलरची झलकही दाखवण्यात आली. यावेळी देवेंद्र फडणवीसांनी उपस्थितांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील नद्या प्रदूषित झाल्या आहेत, याबद्दल खंतही व्यक्त केली. तसेच मी आवर्जुन हा चित्रपट पाहणार असेही सांगितले.
आणखी वाचा : “आपला मित्र सोडून निघून गेल्यानंतर…” ‘गोदावरी’च्या निमित्ताने जितेंद्र जोशीची ‘ती’ पोस्ट चर्चेत

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

“मी जितेंद्र जोशी यांचे खूप खूप अभिनंदन करतो की गोदावरीशी नात सांगणारा हा अतिशय सुंदर चित्रपट ११ तारखेला प्रदर्शित होतोय. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी तो आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचला आहे. या चित्रपटाला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. निश्चितच ही आमच्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. आमच्या मराठी चित्रपटाचा आशय आणि दर्जा नेहमीच जागतिक राहिला आहे. त्याच मांदियाळीतला एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

नदीचे जे नातं आहे ते अत्यंत जुनं आहे. संस्कृती, सभ्यता या सर्व गोष्टींचा थेट संबंध नदीशी राहिलेला आहे. आपल्या ऋग्वेदामध्ये नदी स्तुति सूक्त आहे, त्यात नदीशी संवाद आहे. ऋषींनी जो नदीशी संवाद केला आहे त्यातून आपल्या नदीचं महात्म्य आपल्यापर्यंत पोहोचलं आहे. पण दुर्देवाने मधल्या काळात आपण ते महात्म्य विसरलो आणि त्यातून आमच्या नद्या प्रदूषित झाल्या, आमचे विचारही प्रदूषित झाले. आमचे संस्कार आणि जीवनही प्रदूषित झाले. त्यामुळे हा चित्रपट मी निश्चित पाहणार.

यामुळे नदीशी आमचं असलेलं नात पुर्नजिवित करता येईल. विशेषत: गोदावरी तर आमची जीवनदायनी आहे. महाराष्ट्रात आपण जवळजवळ ५० टक्के त्यावर अवलंबून आहे. त्याच्या उपनद्या आहेत. आपल्याकरिता गोदावरी ही जीवनदायिनी आहे. त्यामुळे निश्चितपणे महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी व्यक्ती स्वत:चं जीवन या चित्रपटाशी रिलेट करेल. मी खरंच मनापासून शुभेच्छा देतो. तसेच या निमित्ताने मी स्वत:लाही आठवण करुन देतो, आपल्या सर्वांवर आपल्या नद्या जपण्याची जबाबदारी आहे.

आपल्या नद्या या खराब झाल्यात. कारखाने आणि इतर गोष्टींमुळे १० टक्के आणि इतर ९० टक्के हे गावांचं आणि शहरांचे मल्लनिसरण योग्यरित्या न होता ते नद्यांमध्ये जातंय त्यामुळे त्या खराब झाल्या आहेत. त्यामुळेच आम्ही एक प्रकल्प हाती घेतला आहे. याद्वारे शहरांचे गावाचे पाणी हे शुद्ध होऊन नदीत जाईल. त्यामुळे आपल्या नद्या आपल्याला पूर्वीसारख्या अविरलपणे, निर्मळपणे वाहताना दिसतील. या प्रक्रियेत गोदावरी हा चित्रपट एक वेगळा ठसा उमटवले. त्यामुळे मी मनापासून या चित्रपटाला शुभेच्छा देतो”, असे त्यांनी सांगितले.

आणखी वाचा : गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी ५ मराठी चित्रपटांची निवड, नावं जाहीर

दरम्यान या चित्रपटात गोदावरीकाठच्या शहरामध्ये राहणाऱ्या निशिकांत देशमुख आणि त्याच्या कुटुंबाची कथा ‘गोदावरी’मध्ये दाखवण्यात आली आहे. जितेंद्र जोशीने यामध्ये मुख्य भूमिका देखील साकारली आहे. त्याचसोबतच नीना कुळकर्णी, संजय मोने, गौरी नलावडे, विक्रम गोखले, प्रियदर्शन जाधव, सखी गोखले या कलाकारांच्या देखील या चित्रपटामध्ये महत्त्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन निखिल महाजन यांनी केले आहे. तसेच प्राजक्ता देशमुख आणि निखिल महाजन यांनी या चित्रपटाची कथी लिहिली आहे. आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये आपलं स्थान मिळवणारा हा चित्रपट ११ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होत आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devendra fadnavis talk about river pollution godavari marathi movie trailer launch nrp
First published on: 31-10-2022 at 13:55 IST