Devmanus Fame Kiran Gaikwad New Movie As Director : ‘देवमाणूस’ या मालिकेतून घराघरांत लोकप्रिय झालेला प्रेक्षकांचा लाडका अभिनेता म्हणजेच किरण गायकवाड. गणेशोत्सवानिमित्त एक खास पोस्ट शेअर करत किरणने त्याच्या तमाम चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. अभिनेता एका वेगळ्याच रुपात प्रेक्षकांसमोर येणार आहे. ही गुडन्यूज नेमकी काय आहे पाहुयात…
आजवर किरणला प्रेक्षकांनी खलनायकाच्या भूमिकेत पाहिलंय. मात्र, आता तो पहिल्यांदाच लेखक, पटकथाकार, दिग्दर्शकाच्या रुपात सर्वांसमोर आला आहे. किरणने त्याच्या आगामी सिनेमाची घोषणा केली असून, याचं पहिलं पोस्टर गणेशोत्सवानिमित्त लॉन्च करण्यात आलं आहे.
किरण शकुंतला गायकवाड दिग्दर्शित ‘FIR No 469’ हा सिनेमा २२ जानेवारी २०२७ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाच्या पहिल्याच पोस्टवर प्रेक्षकांना अभिनेता नचिकेत पूर्णपात्रेची झलक पाहायला मिळतेय. त्याच्यासह या चित्रपटात प्रसाद ओक, अमृता धोंगडे, राहुल मगदूम, निखिल चव्हाण, देवेंद्र गायकवाड, पिट्या भाई रमेश परदेशी, सुहास शिरसाट, योगेश शिरसाठ, अंकिता अशोक, हार्दिक जोशी, अंकुश मांडेकर असे लोकप्रिय कलाकार एकत्र झळकणार आहेत.
किरणने नव्या सिनेमाची घोषणा करताच नेटकऱ्यांसह मराठी कलाकारांनी त्याला भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. किरण या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहितो, “गणपती बाप्पाचं आगमन झालंय आणि याचबरोबर महाराष्ट्रात दाखल होतेय एक थरारक केस ‘FIR No 469’! तपास सुरू झालाय.. नजर ठेवा…कारण आता FIR No 469 थेट तुमच्यापर्यंत पोहोचत आहे! २२ जानेवारी २०२७ तारीख विसरू नका. केस गंभीर आहे आणि यावेळी सत्यापर्यंत पोहोचणं सोपं नाही!”
दरम्यान, आता या ‘FIR No 469’मध्ये प्रेक्षकांना काय पाहायला मिळणार, याचा उलगडा लवकरच सिनेमाच्या आगामी टीझर आणि ट्रेलरमधून होईल.
