Dhairya Gholap Sister Forbes 40 Under 40: ‘येक नंबर’ हा सिनेमा २०२४ मध्ये प्रदर्शित झाला होता. राजेश मापुस्कर यांनी दिग्दर्शित केलेल्या या सिनेमाची चांगलीच चर्चा झाली होती. त्यामध्ये सायली पाटील, धैर्य घोलप, राजेश खेरा, तेजस्विनी पंडित हे कलाकार दिसले होते. या चित्रपटासाठी धैर्य घोलपला २०२५ च्या फिल्मफेअर मराठी अवॉर्डसमध्ये सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेता हा पुरस्कार मिळाला होता.
या सिनेमाबरोबरच धैर्य घोलप अथांग या वेब सीरिजमध्येदेखील दिसला होता. ‘तान्हाजी: द अनसंग वॉरियर’ या चित्रपटातदेखील अभिनेता महत्त्वाच्या भूमिकेत दिसला होता. धैर्य विविध भूमिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येतो. त्याबरोबरच, तो सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात सक्रिय असतो. त्याच्या विविध पोस्ट लक्ष वेधून घेतात.
“त्यावेळी माझ्या डोळ्यासमोरून इतक्या वर्षांचा….”
आता अभिनेत्याने नुकतीच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. बहिणीबरोबरचे काही फोटो शेअर करत त्याने त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. बहिणीचे नाव फोर्ब्स ४० अंडर ४० च्या यादीत झळकल्यानंतरचा आनंद त्याने व्यक्त केला आहे.
धैर्यने लिहिले, “फोर्ब्स ४० अंडर ४० च्या प्रतिष्ठित लिस्टमध्ये माझ्या बहिणीचं नाव झळकलं आणि पुरस्कार घरी आला. त्यावेळी माझ्या डोळ्यासमोरून इतक्या वर्षांचा फ्लॅशबॅक गेला.”
“माझे बाबा बोर्डात आले होते. त्यामुळे साहजिकपणे त्यांच्या माफक अपेक्षा अशा होत्या की, त्यांच्या दोन्ही मुलांनी अभ्यासात कधी मागे पडू नये. त्यामुळे ते आमच्या लहानपणापासून आम्हाला जमेल त्या पद्धतीने अभ्यासात गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न करायचे.”
पुढे त्याने लिहिले, “आमची ताई कायम त्यांनी सांगितलेल्या गोष्टी ऐकायची आणि पुस्तकांमध्ये हरवलेली असायची. आम्ही शाळा-कॉलेजमध्ये असताना बाबा सकाळी ५ वाजता उठायचे. आम्हाला ड्रायफ्रूट्स आणि गरम दूध करून ठेवायचे. मग, आम्हाला उठवायचे व अभ्यासाला बसवायचे आणि मग ऑफिसला जायचे.”
“एखाद्या गोष्टीची तपश्चर्या आणि कठोर मेहनत करत नाही तोपर्यंत यश साध्य होत नाही. जे करायचं आहे, ते प्रचंड प्रामाणिकपणे करा.
जीव तोडून मेहनत केली तरी सगळं साध्य होऊ शकतं. जमत नाही म्हणजे काय? लाथ मारीन तिथे पाणी काढीन, असं असावं. ही त्यांची शिकवण होती.”
हे ताईला तेव्हाच कळलं होतं. त्यामुळे तिनं नंबरात येणं कधी सोडलं नाही. ती बिचारी मन लावून इंग्रजी, गणित, विज्ञान असे कठीण विषय बाबांकडून शिकत बसायची. तेव्हा मला ते ‘दंगल’मधील आमिरखान सारखे वाटायचे आणि ते माझ्याकडे ‘तारे जमीन पर’मधल्या ईशान अवस्थीसारखे बघायचे. ते दिवस फारच अविस्मरणीय आणि गमतीशीर होते. या सगळ्या शिकवणीचा अर्थ वय वाढत गेलं तसा उलगडायला लागला. क्षेत्र कोणतं का असेना यश मिळवायचंय, तर तपश्चर्येला पर्याय नाही.”
धैर्यने पुढे लिहिले, “आज आम्ही दोघंही भावंडं त्यांनी दिलेल्या शिकवणीवर विश्वास ठेवून आपापल्या क्षेत्रात मेहनतीनं काम करण्याचा प्रयत्न करत आहोत. यश मिळो वा अपयश; प्रयत्न मात्र प्रामाणिकपणे सुरू असतात.
“आई म्हणत होती की, मुलाला पहिल्याच सिनेमासाठी फिल्मफेअर मिळाला आणि आता मुलीला फोर्ब्सच्या टॉप ४० अंडर ४० मध्ये मान मिळाला. आज बाबा जाऊन १५ वर्षं झाली. ते आज असते, तर त्यांना हे चित्र पाहून अतिशय आनंद झाला असता. असो! माझ्या आई-बाबांसारखाच मलादेखील माझ्या बहिणीचा प्रचंड अभिमान आहे. तिला तिच्या पुढील वाटचालीसाठी आभाळभर शुभेच्छा.”
धैर्यच्या या पोस्टवर अनेकांनी त्याच्या बहिणीला स्नेहल घोलप यांना स्थान दिले आहे. त्यामध्ये कलाकारांचादेखील समावेश आहे.

