scorecardresearch

‘पावनखिंड’च्या यशानंतर अजय पुरकर साकारणार तानाजी मालुसरेंची भूमिका; मराठीतील ऐतिहासिक चित्रपट ‘सुभेदार’ची चर्चा

मराठीमध्ये नव्या ऐतिहासिक चित्रपटाची चर्चा सुरु झाली आहे. दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित नवा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होईल.

‘पावनखिंड’च्या यशानंतर अजय पुरकर साकारणार तानाजी मालुसरेंची भूमिका; मराठीतील ऐतिहासिक चित्रपट ‘सुभेदार’ची चर्चा
मराठीमध्ये नव्या ऐतिहासिक चित्रपटाची चर्चा सुरु झाली आहे. दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित नवा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होईल.

लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या ‘श्री शिवराज अष्टक’मधील पाचव्या चित्रपटाची काही दिवसांपूर्वीच घोषणा झाली. ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’, ‘शेर शिवराज’ या चार ऐतिहासिक चित्रपटांनंतर ‘सुभेदार’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये कोणते कलाकार मुख्य भूमिकेत काम करताना दिसणार हे आता समोर आलं आहे.

‘सुभेदार’ या चित्रपटाद्वारे नरवीर तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाची गाथा रुपेरी पडद्यावर दाखवण्यात येणार आहे. या चित्रपटामध्ये तानाजी मालुसरे यांची भूमिका कोण साकारणार? याची आता घोषणा करण्यात आली आहे. नुकतंच या चित्रपटाच्या संहिता पूजनाचा कार्यक्रम तानाजी मालुसरे यांचं मूळ गाव गोडवली (वाई) येथे पार पडला.

दिग्पाल लांजेकर यांच्यासह चित्रपटातील कलाकार मंडळींनी तानाजी मालुसरे यांची समाधी असलेल्या उमरठ गावाला भेट दिली. याचदरम्यान अभिनेते अजय पुरकर तानाजी मालुसरे यांची भूमिका साकारणार असल्याचं समोर आलं. त्याचबरोबरीने अभिनेत्री स्मिता शेवाळे तानाजी मालुसरे यांच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे.

आणखी वाचा – ‘शिवराज अष्टका’तील पाचव्या चित्रपटाची अखेर घोषणा, ‘या’ मोहिमेवर असणार आधारित

अभिनेता समीर धर्माधिकारी शेलार मामा यांच्या भूमिकेमध्ये काम करताना दिसेल. लवकरच या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे. ‘सुभेदार’ चित्रपट पुढील वर्षी जून महिन्यात प्रदर्शित होईल.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा ( Marathi-cinema ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-12-2022 at 12:10 IST

संबंधित बातम्या