लोकप्रिय दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या ‘श्री शिवराज अष्टक’ मालिकेतील ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ या चित्रपटाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. यात लोकप्रिय अभिनेता अभिजीत श्वेतचंद्र हा छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारत आहे.
दिग्पाल लांजेकर यांच्या याआधीच्या सिनेमात अभिनेता चिन्मय मांडलेकरनं छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती. त्यानंतर मुलाच्या नावावरून झालेल्या ट्रोलिंगनंतर अभिनेत्यानं भविष्यात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करणार नसल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे आगामी सिनेमांत छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका कोण साकारणार, याची सर्वांना उत्सुकता होती.
अखेर काही दिवसांपूर्वी अभिजीत श्वेतचंद्रचं नाव समोर आलं. या भूमिकेसाठी त्याची निवड कशी करण्यात आली, याबद्दल नुकतंच दिग्पाल यांनी सांगितलं.
लोकसत्ता डिजिटल अड्डा मध्ये ते म्हणाले, “‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’मधून एक नवीन कथा सांगतोय, त्यात एक नवीन चेहरा हवा असं आम्हाला सर्वांना वाटत होतं. छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा आग्र्याला गेले तेव्हा ते फक्त ३६ वर्षांचे होते. ३६ वर्षांचा व्यक्ती सर्वांना रिलेट करायला सोपा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी तेव्हा इतक्या मोठ्या साम्राज्याला दिलेली धडक ही ३६ वर्षांच्या व्यक्तीच्या रूपात चित्रपटातून दिसावी म्हणून कोणता चेहरा हवा, अशी चर्चा झाली आणि या चर्चेतून अभिजीतचं नाव समोर आलं आहे.”
यापुढे ते म्हणाले, “अभिजीत आमच्याबरोबर ‘सुभेदार’ सिनेमापासून काम करत आहे. त्याच्या अभिनयाचा वकुब, मेहनत करण्याची तयारी आणि कामात स्वत:ला झोकून देणं हे गुण कौतुकास्पद आहेत. ‘सुभेदार’नंतर त्याने ‘मुक्ताई’, ‘अभंग तुकाराम’ या सिनेमात आमच्यासह एकत्र काम केलं आहे. त्याला आम्ही जवळून पाहत होतो. कोणत्याही भूमिकेसाठी तो मेहनत घेऊन काम करत असल्याचं आम्ही पाहिलं होतं. मग एआयच्या माध्यमातून त्याचा चेहरा फिट बसतो कि नाही, हे बघितलं. उगाच लाडका आहे म्हणून त्याला ही भूमिका दिलीय, असं केलं नाही. जवळपास १० लूक टेस्ट केल्या. त्याच्या लूकसाठी खूप तयारी करण्यात आली. ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांसमोर आणण्याआधी आम्हाला स्वत:ला त्याच्याविषयी खात्री असणं आवश्यक होतं. ती खात्री आम्हाला पटली आणि मग त्याचा चेहरा पुण्यातल्या कार्यक्रमात रिव्हिल करण्यात आला.”
दरम्यान, ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ हा सिनेमा आधी ३० जानेवारी रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र, ही तारीख पुढे ढकळण्यात आली आणि अखेर हा चित्रपट आज ६ फेब्रुवारी पासून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

