सध्या मराठीमध्ये उत्तमोत्तम ऐतिहासिक चित्रपट प्रदर्शित होत आहेत. ‘पावनखिंड’, ‘फत्तेशिकस्त’, ‘फर्जंद’ यांसारख्या ऐतिहासिक चित्रपटांना तर प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. या सगळ्या चित्रपटांचं दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर यांनी केलं. आता दिग्पाल यांनी त्यांच्या आगामी ऐतिहासिक चित्रपटाच्या तयारीला सुरुवात केली आहे. अशातच आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त एक अभिमानास्पद गोष्ट घडली आहे.
इस्राईलच्या सांस्कृतिक मंत्रालयाने इस्राईलमधील एका रस्त्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्याचा प्रस्ताव त्यांच्या शासनासमोर ठेवला आहे. याबाबत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल माहिती मिळवण्यासाठी इस्राईलचे conculate यांनी दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांची भेट घेतली आणि छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल चर्चा केली.
दिग्पाल लांजेकर यांनी एक पोस्ट शेअर करत ही बातमी चाहत्यांना सांगितली आहे. त्यांनी लिहिलं, “ईस्राईल… छळाकडून बळाकडे गेलेल्या या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपार उत्सुकता आहे. त्याचाच एक भाग म्हणून इस्राईलच्या सांस्कृतिक मंत्रालयाने इस्राईलमधील एका रस्त्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्याचा प्रस्ताव त्यांच्या शासनासमोर ठेवला आहे. विविध क्षेत्रांतील कामामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा सांगणाऱ्या लोकांशी चर्चा करून इस्राईल चे Consulate हे शिवरायांच्या बाबतीत माहिती गोळा करत आहेत. Consulate ऑफिस मधून आलेल्या निमंत्रणानुसार Consul general Mr. Kobbi Shoshani यांची भेट झाली.”
हेही वाचा : बिरबलाच्या भूमिकेतील फर्स्ट लूकमुळे सुबोध भावे ट्रोल, नेटकरी म्हणाले, “अरे देवा…”
पुढे ते म्हणाले, “त्यावेळी त्यांच्याशी शिवरायांच्या रोमहर्षक प्रशासकीय गुणांची आणि त्यासंदर्भातील प्रसंगांची चर्चा झाली. या चर्चेच्या वेळी दिग्पाल लांजेकर यांनी सांगितलेले मुद्दे ऐकल्यानंतर श्री. kobbi यांनी शिवरायांची प्रशंसा केली. त्यांना कृष्णराव अर्जुन केळुसकर यांचा अनुवादित ग्रंथाची इंग्रजी प्रत आणि महाराजांच्या जिरेटोपाचे स्मृतिचिन्ह श्री. दिग्पाल लांजेकर यांनी भेट दिले.छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव त्रिखंडात असेच गाजत राहो आणि या शिवयज्ञात सातत्याने आमच्याकडून समिधा अर्पण होत राहोत ही शिवचरणी प्रार्थना…” ही पोस्ट खूप चर्चेत आली असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.