Pravin Tarde make ajit pawar biopic : दिग्दर्शक व अभिनेते प्रवीण तरडे यांचा ‘देऊळ बंद २’ चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. यापूर्वी प्रवीण तरडे यांनी केलेल्या ‘देऊळ बंद’, ‘मुळशी पॅटर्न’, ‘सरसेनापती हंबीरराव’ आणि ‘धर्मवीर’ या चित्रपटांना प्रचंड यश मिळाले आहे. धर्मवीर चित्रपटामध्ये दिवंगत नेते आनंद दिघे यांचा जीवनप्रवास मांडण्यात आला होता. यानंतर कोणत्या राजकीय व्यक्तीचा बायोपिक केला तर दिवंगत नेते अजित पवार यांच्या आयुष्यावर करेन, असे प्रवीण तरडे म्हणाले आहेत.

दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी महाराष्ट्र टाईम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये राजकीय नेत्यांच्या जीवनपटाबाबत मत व्यक्त केले. प्रवीण तरडे म्हणाले, “धर्मवीर चित्रपट आल्यानंतर अनेक राजकीय नेत्यांचे फोन आले. त्यांची नावे आता घेऊ शकत नाही. पण, दिघे साहेबांचा चित्रपट झाला तसा आमच्या नेत्यांचा चित्रपट तुम्हीच केला पाहिजेत, असे अनेकांचे फोन आले. पण मी ते नाही घेतले,” असा खुलासा प्रवीण तरडे यांनी केला आहे. यापुढे जर कोणाचा बायोपिक करायचा असेल तर ते अजित पवार असतील, असे देखील त्यांनी सांगितले.

मंत्रालयाच्या पायऱ्या सुद्धा आठवण काढत असतील – प्रवीण

ते पुढे म्हणाले की, अजित पवारांना मी जवळून ओळखत होतो. माझा त्यांच्याशी संपर्क आला होता. अजित पवार यांचे आयुष्यसुद्धा तसे होते. सकाळी सहा वाजता मंत्रालयामध्ये हजर राहणारा हा व्यक्ती होता. आता मंत्रालयाच्या पायऱ्या सुद्धा अजित पवारांची आठवण काढत असतील. त्या पायऱ्या सुद्धा म्हणत असतील की, सकाळी सकाळी येणारी काही पाऊले आता दिसत नाहीत. कुठे गेला तो माणूस, असे त्या पायऱ्यांना सुद्धा वाटत असेल, अशा भावना प्रवीण तरडे यांनी व्यक्त केल्या आहेत.

पुढे प्रवीण तरडे पुढे म्हणाले की, अजित पवारांच्या रुपाने सकाळी सहा वाजता मंत्रालयामध्ये हजर राहणारा मंत्री आपल्याकडे होता पण तो आपण गमावला. तोच विषय सध्या डोक्यामध्ये आहे. यापुढे राजकीय व्यक्तींचे चित्रपट करणार नव्हतो कारण, दिघेंसाहेबांवर चित्रपट केल्यानंतर मी काय कोणावर चित्रपट करणार. पण अजित पवार यांचे आयुष्य असे आहे की त्यावर चित्रपट होऊ शकतो. यापूर्वी मी अनेकांना नाही म्हणत होतो, या आशयाचे वक्तव्य दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी केले आहे. त्यामुळे लवकरच दिवंगत नेते अजित पवार यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट येण्याची शक्यता आहे.

‘मुळशी पॅटर्न २’ ची घोषणा

दरम्यान, २०१८ मध्ये प्रदर्शित झालेला, शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल दरात विकत घेऊन त्यावर कॉर्पोरेट स्वप्न उभारणाऱ्यांचे वास्तव समोर आणणाऱ्या ‘मुळशी पॅटर्न’ या गाजलेल्या चित्रपटाच्या सिक्वेलपटाची तयारी सुरू झाली आहे. ‘मुळशी पॅटर्न २’ चित्रपटाची घोषणा प्रवीण तरडे यांनी केली असून यामध्ये वाळू माफियांच्या वाढते जाळे आणि त्यामागील वास्तव मांडण्यात येणार आहे. पुनीत बालन स्टुडिओ आणि अभिजीत भोसले जेन्युन प्रॉडक्शन यांच्या वतीने या चित्रपटाची निर्मिती करण्यात येणार आहे.