Ravi Jadhav Shares Nagraj Manjule Fandry Song BTS Story : फँड्री… २०१४ मध्ये आलेल्या या सिनेमाची कलाविश्वात आजही चर्चा होते. नागराज मंजुळे यांचा हा पहिलाच सिनेमा. चित्रपटाच्या कथेने व चित्रपटातील कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनावर गारुड केले होते. त्यात यातलं ‘तुझ्या पिरतीचा विंचू मला चावला’ गाणंसुद्धा तूफान गाजलं. याच गाण्याची एक आठवण दिग्दर्शक रवी जाधव यांनी शेअर केली आहे.
अमोल परचुरेंच्या कॅचअप मुलाखतीत रवी जाधव म्हणाले, “‘फँड्री’साठी एक प्रमोशनलं गाणं असावं, असं मला वाटतं होतं. तेव्हा ‘टाइमपास’ हिट झाला होता आणि त्याच्या सक्सेस पार्टीसाठी आम्ही पुण्यात एकत्र भेटलो होतो. तेव्हा निखिल साने म्हणाला, ‘आपल्याला या सिनेमासाठी काही करता येईल का?’ तेव्हा मी त्याला म्हटलं होतं की, ‘यात एखादं गाणं असेल तर मजा येईल. पण गाणंसुद्धा असं हवं होतं जे त्या कथेशी निगडीत असेल’.”
पुढे ते म्हणाले, “तेव्हा अजय-अतुल यांचे वडील नुकतेच गेले होते. मला आठवतंय आम्ही अजयला फोन केला होता. तेव्हा अजय म्हणालेला की, ‘ही काय वेळ आहे का? तुम्हाला माहिती आहे काय सुरू आहे.’ तेव्हा मी म्हटलेलं, ‘एकदा सिनेमा बघा. कारण ही तुमचीच गोष्ट आहे. प्लीज काही करता आलं तर बघा’.”
‘तुझ्या पिरतीचा विंचू मला चावला’मुळे सिनेमाला एक पुश मिळाला
पुढे रवी जाधव यांनी सांगितलं, “दुसऱ्या दिवशी नागराज अजय-अतुल यांना सिनेमा दाखवण्यासाठी डीव्हीडी घेऊन गेला. तेव्हा त्यांनी तो सिनेमा पाहिला आणि त्यांना आवडलादेखील. सिनेमा पाहून त्यांनी ‘तुझ्या पिरतीचा विंचू मला चावला’ हे गाणं केलं. ते गाणं पहिल्यांदाच ऐकलं; तेव्हा सर्वांनाच आवडलं. मग ते गाणं सिनेमात आलं आणि त्यामुळे सिनेमाला एक पुश मिळाला.”
‘फँड्री’ पाहून असं वाटलं की, सिनेमासाठी काहीतरी केलं पाहिजे!
यानंतर रवी जाधव म्हणाले, “‘फँड्री’ सिनेमा पाहून मला असं वाटलं की, सिनेमासाठी काहीतरी केलं पाहिजे. त्यात नागराज मंजुळेबद्दल मला प्रचंड प्रेम आहे. नागराजचा ‘फँड्री’ सिनेमा पाहून मला वाटलं की, मराठीत काहीतरी वेगळं घडतंय. त्यानं ज्यापद्धती तो सिनेमा मांडला होता. त्यामुळे मी त्याच्याशी कनेक्ट झालो. मी स्वत:ही जेव्हा ‘नटरंग’निमित्ताने इंडस्ट्रीत आलो, तेव्हा मला झी समूहाने किंवा इतरांनी पाठिंबा दिला नसता, तर मी पुढे येऊ शकलो नसतो. त्यामुळे मग मला वाटलं की देवाने जे दान दिलं आहे, त्याचा उपयोग करू. त्यामुळे असं वाटलं की, मी काहींना मदत करू शकतो. म्हणून मग जाहिरात, प्रमोशननिमित्ताने मला जे करता आलं ते मी केलं.”
