Director Santosh Davakhar Reaction on Gondhal Oscar Entry : २०१५ मधील ‘कोर्ट’ या चित्रपटानंतर तब्बल ११ वर्षांनी पुन्हा एकदा मराठी चित्रपटसृष्टीने जागतिक मंचावर इतिहास रचला आहे. संतोष डावखर दिग्दर्शित ‘गोंधळ’ (Gondhal) या मराठी चित्रपटाला ९९ व्या ऑस्कर पुरस्कारांसाठी भारताची अधिकृत एंट्री म्हणून निवडण्यात आले आहे. देशभरातील ३० हून अधिक दिग्गज सिनेमांमधून एफएफआयच्या (FFI) ज्युरींनी ‘गोंधळ’ची निवड केल्यावर दिग्दर्शक संतोष डावखर भावुक झाले. ऑलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंसारखा अभिमान वाटत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.
देशभरातील ३० पेक्षा जास्त चित्रपटांमधून ‘गोंधळ’ची निवड झाली. त्याबद्दल संतोष डावखर म्हणाले, “या चित्रपटाचा मूळ गाभा भारतीय मातीतला असला, तरी चित्रपटाची सिनेमॅटिक भाषा, तांत्रिक गुणवत्ता आणि निर्मितीमूल्ये आंतरराष्ट्रीय दर्जाची आहेत. त्यामुळे जागतिक स्पर्धेत हा चित्रपट प्रभावीपणे उभा राहू शकतो, याबद्दल आम्हाला पूर्ण विश्वास आहे.”
संतोष डावखर यांनी मानले आभार
“आमच्या चित्रपटावर विश्वास दाखवल्याबद्दल भारत सरकार, फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया आणि एफएफआयच्या निवड समितीतील सर्व मान्यवर ज्युरी सदस्यांचे आम्ही मनःपूर्वक आभार मानतो. अनेक मोठ्या आणि दर्जेदार चित्रपटांमधून ज्युरीने ‘गोंधळ’ची निवड केली, ही आमच्यासाठी सन्मानासोबतच एक मोठी राष्ट्रीय जबाबदारी आहे,” अशा भावना संतोष डावखर यांनी व्यक्त केल्या.
“लहानपणापासून ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंकडे आम्ही अपार अभिमानाने पाहात आलो आहोत. आज ‘गोंधळ’च्या माध्यमातून जागतिक व्यासपीठावर भारताचे प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी आमच्यावर आली आहे, तेव्हा मनात अगदी तशीच भावना आहे. हा केवळ एका चित्रपटाचा गौरव नाही, भारतीय संस्कृती, महाराष्ट्राची जिवंत लोकपरंपरा आणि आपल्या मातीतून जन्मलेल्या कथेला मिळालेला राष्ट्रीय सन्मान आहे,” असं संतोष डावखर म्हणाले.
या सर्वोच्च सन्मानाविषयी बोलताना सर्वप्रथम माझ्या डोळ्यांसमोर ‘गोंधळ’ची संपूर्ण टीम उभी राहते. प्रत्येक कलाकार, तंत्रज्ञ आणि सहकाऱ्याने प्रामाणिकपणे, व्यावसायिक निष्ठेने आणि जिवापाड मेहनत घेऊन हा चित्रपट उभा केला. त्यामुळे या यशाचे श्रेय माझ्या एकट्याचे नसून संपूर्ण ‘गोंधळ’ परिवाराचे आहे. सध्या आम्ही सर्वजण वेगवेगळ्या ठिकाणी असलो, तरी येत्या दोन-तीन दिवसांत संपूर्ण टीम एकत्र येऊन या ऐतिहासिक क्षणाचा आनंद साजरा करणार आहोत, असंही संतोष डावखर यांनी सांगितलं.
“माझ्या कुटुंबीयांनी माझ्यावर आणि या स्वप्नावर अखंड विश्वास ठेवला. या प्रवासात प्रत्येक स्तरावरील सहकाऱ्यांनी आपापल्या जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळल्या. त्यांनी व्यावसायिक कामकाजाची जबाबदारी स्वीकारल्यामुळे मला पूर्ण एकाग्रतेने चित्रपटनिर्मितीकडे लक्ष देता आले. उत्तम टीम, कुटुंबाचा विश्वास आणि सर्व सहकाऱ्यांच्या भक्कम पाठबळामुळेच हा प्रवास शक्य झाला. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीपासूनच आम्ही एक गोष्ट ठामपणे सांगत आलो आहोत, ‘गोंधळ’ची तुलना केवळ प्रादेशिक चित्रपटांशी न करता जगातील सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय चित्रपटांशी व्हावी. आज एफएफआयच्या ज्युरीने ‘गोंधळ’वर दाखवलेला विश्वास आमच्या त्या भूमिकेला आणखी बळ देणारा आहे,” असं संतोष डावखर म्हणाले.
गोंधळ ५ भाषांमध्ये प्रदर्शित होणार- संतोष डावखर
९९व्या अकादमी पुरस्कारांसाठीचे आमचे आंतरराष्ट्रीय अभियान लवकरच सुरू होत आहे. त्यासाठी रोडमॅप तयार करण्यात आला आहे. भारताचे प्रतिनिधित्व जागतिक स्तरावर अत्यंत ताकदीने, प्रतिष्ठेने आणि जबाबदारीने करण्यासाठी आमची संपूर्ण टीम सज्ज आहे. ‘गोंधळ’ पाच वेगवेगळ्या भारतीय भाषांमध्ये प्रदर्शनासाठी तयार आहे. त्याचबरोबर चित्रपटाच्या जागतिक प्रदर्शनाचेही नियोजन करण्यात आले आहे. भारतातील आणि जगभरातील प्रदर्शनाच्या तारखा आम्ही लवकरच अधिकृतपणे जाहीर करू. प्रेक्षकांनी कोणत्याही अनधिकृत किंवा पायरेटेड प्रतीवर अवलंबून न राहता ‘गोंधळ’ चित्रपटगृहातच अनुभवावा, असे आवाहन संतोष डावखर यांनी केले.
