Santosh Davkhar Reply To Anurag Kashyap On Gondhal Oscar Selection: ऑस्करसाठी भारताकडून मराठी ‘गोंधळ’ या सिनेमाची अधिकृत निवड झाली आहे. मात्र, आपण ऑस्करसाठी चुकीच्या सिनेमांची निवड करत असल्याचे वक्तव्य लोकप्रिय दिग्दर्शक अनुराग कश्यपने केले. ऑस्करसाठीच्या निवडीवर नाराजी व्यक्त केल्यानंतर ‘गोंधळ’ सिनेमाचे दिग्दर्शक संतोष डावखर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
‘गोंधळ’ सिनेमाला बॉक्स ऑफिसवर अपेक्षित यश मिळाले नसले तरी सिनेमाची चर्चा आंतरराष्ट्रीय स्तरावर झाली आहे. सिनेमात महाराष्ट्राची संस्कृती, परंपरेचे प्रभावी चित्रण, सिनेमॅटिक भाषा, तांत्रिक गुणवत्ता यांमुळे ‘गोंधळ’ची ऑस्करसाठी निवड झाली आहे. मात्र, अद्याप ‘गोंधळ’ हा सिनेमा पाहिला नसल्याचे अनुराग कश्यपने सांगितले. त्याच्या वक्तव्यावर आता दिग्दर्शक संतोष डावखर यांनी कोणतेही मत बनवण्यापूर्वी सिनेमा आधी नक्की बघा, असे मत व्यक्त केले.
काय म्हणाले संतोष डावखर?
सोशल मीडियावर संतोष डावखर यांनी लिहिले, “मी अनुराग कश्यप यांचा आणि त्यांच्या फिल्म मेकिंगचा खूप आदर करतो. २६ एप्रिल रोजी रात्री ११:५५ वाजता बंगळुरू-मुंबई विमानात मी त्यांना ‘गोंधळ’बद्दल सांगितले होते. ते म्हणाले की, त्यांनी त्याबद्दल ऐकलेही नाही किंवा पाहिलेही नाही, पण ते सिनेमा नक्कीच पाहतील. पण त्यानंतर सिनेमा प्रेक्षकांसाठी प्रदर्शित झालेला नाही किंवा त्यांचे मुंबईत स्क्रीनिंगही झालेले नाही.”
पुढे त्यांनी लिहिले, “मी सर्व प्रेक्षकांना विनंती करतो की, कोणतेही मत बनवण्यापूर्वी चित्रपट नक्की पाहा. चित्रपटसृष्टीबाहेरून आलेल्या एका नव्या दिग्दर्शकाने बनवलेला ‘गोंधळ’ हा एक सायकोलॉजिकल थ्रिलर आहे. या चित्रपटात मराठी संस्कृतीबरोबरच जागतिक प्रेक्षकांना भावेल असा आशयही पाहायला मिळेल. हा चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी तयार करण्यात आला आहे, ओटीटीसाठी नाही. भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या जबाबदारीची आम्हाला जाणीव आहे आणि आम्ही देशाला निराश करणार नाही.”
अनुराग कश्यप काय म्हणालेला?
‘Variety India’ला दिलेल्या मुलाखतीत, अनुराग कश्यपला भारताला ऑस्कर का मिळत नाही, असा प्रश्न विचारण्यात आला. यावर तो म्हणाला, “कारण आपण अगदी चुकीचे चित्रपट निवडतो.” विशेष म्हणजे, ‘गोंधळ’ हा भारताकडून यंदा पाठवण्यात आलेला चित्रपट त्यांनी अद्याप पाहिलेला नसल्याचंही स्पष्ट केलं. अनुराग कश्यपने सांगितलं की, भारताकडे ‘द लंचबॉक्स’ आणि ‘ऑल वी इमॅजिन ॲज लाइट’ यांसारख्या योग्य चित्रपटांची निवड करण्याची संधी होती. मात्र, त्याच्या मते फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया (FFI)ने ही संधी गमावली.
