ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने मनोरंजन विश्वात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. वयाच्या ७५ व्या वर्षी त्यांनी गोव्यात अखेरचा श्वास घेतला. यानंतर नानांना अखेरचा निरोप पुण्यातील डोणजे गावी देण्यात आला. मनोरंजन विश्वातील प्रत्येक कलाकाराशी नानांचं खास मैत्रीपूर्ण नातं होतं. अशीच एक आठवण दिग्दर्शक विजू माने यांनी पोस्ट शेअर करत सांगितली आहे.

विजू माने लिहितात, “नानांसह प्रत्यक्ष काम करण्याचा अनुभव आला नाही. परंतु ज्या भेटी झाल्या त्या लक्षात राहण्याजोग्या होत्या. पहिली प्रत्यक्ष भेट झाली होती त्यांच्या माहीमच्या घरी… नाना, महेश मांजरेकर आणि राज साहेब ठाकरे यांच्यासोबत त्या खोलीत उपस्थित असलेलला मी चौथा होतो. अर्थात मी कान उघडे ठेवून होतो. कारण त्यांच्या गप्पांमध्ये बोलण्यासारखं माझ्याकडे काहीच नव्हतं. मग मी ‘नटसम्राट’ सिनेमाच्या सेटवर महेश मांजरेकर यांना भेटायला गेलो होतो. त्यावेळी त्यातल्या एका प्रमुख प्रसंगाचं (कोणी घर देतं का घरचं) चित्रीकरण सुरू होतं. नेमका मी ज्यासाठी उत्सुक होतो तोच प्रसंग माझ्यासमोर चित्रित होत होता. आणि शॉट संपल्यानंतर मॉनिटरवर बसलेल्या प्रत्येकाला नानांनी अगदी लहान मुलासारखं येऊन, “काय ? कसं वाटलं? असं विचारलं होतं. महेश मांजरेकरांसहित सगळ्यांनी तो फार छान झाला असं सांगितलं. मलाही विचारलं. मी त्या सेटवर तसा परका होतो. त्यामुळे मी ‘हं’ एवढीच प्रतिक्रिया दिली. ती मात्र नानांना खटकली. ‘हं’ म्हणजे काय? चांगला झालाय की नाही? त्यावर मी, ‘हो चांगला झाला.’ असे म्हटल्यानंतर माझ्या एकूण व्यक्त होण्यातला कॉन्फिडन्स पाहून नानांचा चेहरा बदलला.”

“पुढच्या सीनसाठी लाइटिंग होत असताना नानांनी ते थांबवायला लावलं. पुन्हा एकदा कॅमेरा आणि लाईट्स त्या-त्या जागेवर न्यायला लावले. तो प्रसंग पुन्हा चित्रित करायला लावला. तो प्रसंग झाल्यावर त्यांनी मला पुन्हा विचारलं, ‘आता रे?’ आणि माझ्या चेहऱ्यावरचे भाव बघितले आणि माझ्या होकाराची वाट न बघता नाना निघून गेले होते.”

“त्याचदिवशी मी ज्या कामासाठी आलो होतो, मी कुतूहलाने मांजरेकरांना विचारलं होतं की, ‘नटसम्राट’ सारख्या कारुण्याची झालर वगैरे असलेल्या भूमिकेसाठी तुमच्या डोक्यात नाना पाटेकर कसे काय येऊ शकतात? एवढ्यात व्हॅनिटीचा दरवाजा वाजला. साक्षात नाना आत आले. मांजरेकरांनी माझी खिल्ली उडवण्यासाठी नानांना सांगितलं ‘हा म्हणतोय तुझं कास्टिंग चुकीचं झालं म्हणून’ माझी तंतरली. मी असं म्हटलं नव्हतं. पण नानांनी मात्र ते अत्यंत गांभीर्याने घेतलं. गरज नसतानाही त्यांनी मला नटसम्राट मधली स्वगतं साभिनय म्हणून दाखवली. त्यांच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहत होतं. मला काय बोलावं हे सुचतच नव्हतं.”

त्यावेळेला मी नानांचा फॅन झालो होतो…

“स्वगतं म्हणून झाल्यावर म्हणाले, ‘अरे हे सगळं असं माझ्या रक्तात आहे. पुस्तकात नव्हे. ‘म्हणून मी हा रोल करतोय. मी स्तब्ध झालो होतो. मी त्या व्हॅनिटीतून उतरलो त्यावेळेला नानांचा फॅन झालो होतो. आपल्या कामावर निष्ठा असलेली माणसंच हिमालयाची उंची गाठू शकतात हे शिकून तिथून बाहेर पडलो होतो.” असा भावुक करणारा अनुभव विजू मानेंनी सांगितला आहे.