महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. त्यामुळे आज मनसे कार्यकर्ते राज ठाकरेंचा वाढदिवस साजरा करताना दिसत आहेत. या खास दिवसानिमित्ताने सोशल मीडियावर राज ठाकरेंवर शुभेच्छांचा वर्षाव होतं आहे. मराठीतील कलाकार मंडळी देखील राज ठाकरेंना शुभेच्छा देताना दिसत आहेत. प्रसिद्ध दिग्दर्शक, अभिनेते विजू माने यांनी राज यांच्या वाढदिवसानिमित्ताने खास पोस्ट लिहिली आहे.

लोकप्रिय दिग्दर्शक विजू माने सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. कधी मजेशीर पोस्ट शेअर करत असतात तर कधी नवनवीन चित्रपटाविषयी स्वतःचं मत व्यक्त करत असतात. त्यामुळे विजू मानेंच्या पोस्ट या कायम चर्चेचा विषय असतात. नुकतीच त्यांनी राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्ताने खास लिहिलेली पोस्ट शेअर केली आहे.

हेही वाचा – Video: “बाल अत्याचाराला खतपाणी…”,’पारू’ मालिकेचा नवा प्रोमो पाहून भडकले नेटकरी, म्हणाले, “निव्वळ फालतूपणा”

विजू माने यांनी एक फोटो शेअर केला आहे. ज्यामधून त्यांनी राज ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहे. विशेष म्हणजे यामध्ये राज ठाकरेंनी विजू मानेंचं काढलेलं अर्कचित्र पाहायला मिळत आहे. हा फोटो शेअर करत विजू मानेंनी लिहिलं, “राजदिवस…ज्यांचं भाषण ऐकायला खरोखर माझे कान आतुर असतात असे हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच नेते महाराष्ट्रात आहेत. त्यात राज ठाकरे यांचा क्रमांक माझ्या लेखी अव्वल आहे. कलाकार म्हणून असलेली संवेदनशीलता त्यांच्या राजकीय यशात अडथळा ठरत असावी…अर्थात हा माझा वैयक्तिक अंदाज आहे.”

“माझे त्यांचे खूप संवाद झालेले नाहीत पण पहिल्यांदा समोर आलो तेव्हा त्यांनी अवघ्या काही सेकंदात माझं अर्कचित्र काढलं. (जे या डिझाइनमध्ये दिसत आहे.) मग एखाद दोन वेळा भेटी झाल्या अर्थात त्या त्यांच्या लक्षात असण्याचं कारण नाही. त्यांच्या व्यक्तिमत्वातील सडेतोडपणा हा सामान्य माणसाला भावतो. पण पुन्हा तो सिनेमातल्या नायकासारखा भावतो. ते जेव्हा त्यांच्या विशिष्ट शैलीत ताशेरे ओढतात तेव्हा त्यांचा सेन्स ऑफ ह्यूमर जोरदार टाळ्या मिळवून जातो. पण हिरोसारखा. हा हिरो प्रत्यक्षात येऊन माझा तारणहार बनू शकेल का? ही शंका एकदा का लोकांच्या मनातून काढून टाकण्यात यश मिळालं की झालं. त्यांच्या स्वप्नात असलेला महाराष्ट्र हा आदर्शवाद आणि राजकारणाच्या आखाड्यातील वास्तववाद यांचा मेळ जमला की झालं. तो दिवस लवकर येवो. हीच ईश्वराकडे प्रार्थना,” असं दिग्दर्शक विजू मानेंनी लिहिलं आहे.

हेही वाचा – Video: रश्मिका मंदानाला ‘या’ मराठमोळ्या चिमुकलीचं लागलं वेड, ‘पुष्पा २’ चित्रपटातील गाणं गात केलेला डान्स पाहून अभिनेत्री म्हणाली…

दरम्यान, विजू माने यांच्या या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं असून चांगली चर्चेत आली आहे. याआधी अभिनेत्री प्राजक्ता माळीने राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्ताने खास पोस्ट शेअर केली होती.