Disha Pardeshi On favourite co actor: दिशा परदेशी सध्या राजा शिवाजी सिनेमामुळे मोठ्या चर्चेत आहे. या सिनेमातील प्रत्येक कलाकाराचे कौतुक होत आहे. बॉक्स ऑफिसवरदेखील राजा शिवाजी सिनेमा धुमाकूळ घालत आहे. रितेश देशमुख दिग्दर्शित या सिनेमाला प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम मिळत आहे.

राजा शिवाजी सिनेमाआधी दिशाला ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेतून लोकप्रियता मिळाली. या मालिकेत तिने तुळजा ही भूमिका साकारली होती. या मालिकेत तिने जवळजवळ वर्षभर काम केले. त्यानंतर प्रकृतीच्या कारणास्तव ही मालिका सोडली होती. त्यानंतर दिशा एका गाण्यातून भेटीला होती. आता राजा शिवाजी सिनेमातील तिच्या भूमिकेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

अभिनेत्रीने नुकतीच राजश्री मराठीला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने राजा शिवाजी सिनेमात काम करण्याचा अनुभव, पाण्यातील सीन, संजय दत्त यांच्याबरोबर स्क्रीन शेअर करण्याचा अनुभव, बोमन इराणी यांच्याबरोबरच्या पडद्यामागच्या गप्पा अशा अनेक गोष्टींबद्दल वक्तव्य केले आहे. याबरोबरच तिच्याबद्दलच्या अफवांबद्दलही तिने वक्तव्य केले आहे, ती नेमकं कायम म्हणाली आहे, हे जाणून घेऊ…

“मी या अफवांकडे कसं दुर्लक्ष करायचं…”

लाखात एक आमचा दादा मालिकेतील प्रमुख भूमिका सोडल्यानंतर पुढे भूमिकांसाठी विचारलं जाईल का, ही मनात भीती होती का? यावर दिशा म्हणाली, “ही भीती अनेकदा वाटली. खूप भीती वाटते. मी माझ्याबद्दल अशा अफवा ऐकल्या आहेत, ज्याचा मी विचार करू शकत नाहीत. त्या ऐकल्यानंतर मला त्यावर विश्वास बसला नाही. यातून मी या अफवांकडे कसं दुर्लक्ष करायचं हे मी शिकले आहे. दडपण खूप येतं. आपल्याला नैराश्य येतं. आता पुढे काय, ही चिंता वाटते. आज माझ्याकडे राजा शिवाजी आहे, पुढे काय असं वाटत राहतं. याचं दडपण तर मला वाटतं की प्रत्येक कलाकारावर असतं. उत्तम कलाकार असणं तर महत्त्वाचं आहेच पण नशिबाची साथ असणंही गरजेचं आहे. तुमच्या अवती-भोवतीची माणसं चांगली मिळायला पाहिजेत. माझ्याबरोबर प्रत्येकवेळी माझे आई-बाबा असायचे. मी जर कोणत्या तणावाखाली असेल, तर त्यांना कळून जायचं. मी खूश राहावे, मला कोणता तणाव येऊ नये यासाठी ते प्रयत्न करायचे. हक्काची माणसं असणं खूप गरजेचं आहे”, असे म्हणत अभिनेत्रीने तिच्याबद्दल अफवांबद्दल वक्तव्य केले.

याबरोबरच, तिने सोशल मिडिया पाहून निवड केली जाते का, याबद्दलही वक्तव्य केले. ती म्हणाली की अभिनयात माझ्याबरोबर आतापर्यंत मी जितकं काम केलं आहे, त्यात असं झालं नाही. पण, त्याआधी मी मॉडलिंग करत होते, तर तिथे मी हे अनुभवलं आहे. काम मिळण्याबरोबरच जर इतरांचे फॉलोअर्स जास्त असतील तर त्यांना मानधनही जास्त मिळते, असेही मॉडलिंग करताना पाहिल्याचं दिशा म्हणाली.

याच मुलाखतीत तिला सर्वात आवडता सहकलाकार कोणता आहे? यावर दिशा म्हणाली की सगळेच आहेत. पण, मी नितीश चव्हाणबरोबर जास्त काम केलं आहे, तर मी त्याचं नाव घेईन.

दरम्यान, दिशा परदेशी राजा शिवाजी सिनेमानंतर कोणत्या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.