Disha Pardeshi shares working experience in Raja Shivaji Movie ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेतून दिशा परदेशीला मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळाली. आता अभिनेत्रीने ‘राजा शिवाजी’ चित्रपटातून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. ‘राजा शिवाजी’ हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला. या सिनेमातील सर्व कलाकारांचे कौतुक होताना दिसत आहे.

“खूपच भारावलेली, नम्र आणि मनापासून कृतज्ञ…”

आता दिशा परदेशीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. काही फोटो शेअर करत तिने लिहिले, “काही प्रवास फक्त तुमचा मार्ग बदलत नाहीत, ते तुमचा आत्माच बदलून टाकतात. ‘राजा शिवाजी’चा भाग होणं आणि अफजलची बेगम साकारण्याची संधी मिळणं, हा माझ्यासाठी एक असा आशीर्वाद आहे, ज्यासाठी मी कदाचित तयारही नव्हते. सेटवर अनेकदा मी थांबते आणि स्वतःलाच विचारते की हे खरंच माझ्यासोबत घडतंय का?”

पुढे तिने रितेश देशमुखला टॅग करत लिहिले, “रितेश देशमुखसारख्या दिग्गज कलाकाराबरोबर काम करण्याची संधी मिळाली. संजय दत्त, बोमन इराणी यांच्याबरोबर स्क्रीन शेअर करायला मिळाली. तसेच, रोहन मापुस्कर या दूरदृष्टी असलेल्या दिग्दर्शकाचे मार्गदर्शन मिळाले. तसेच जिओ स्टुडिओज आणि डिस्ने प्लस हॉटस्टारसारख्या मोठ्या प्लॅटफॉर्म्सचा विश्वास मिळाला. हे सगळं अजून स्वप्नासारखंच वाटत आहे आणि हे स्वप्न मला संपवायचं नाहीये.”

दिशाने पुढे कृतज्ञता व्यक्त करत लिहिले, “या विश्वासाबद्दल, या संधीबद्दल आणि अशा एका चित्रपटाचा भाग होण्याबद्दल माझ्या मनात अपार कृतज्ञता आहे. एका अनिश्चित टप्प्यानंतर हा चित्रपट मराठी सिनेमाच्या इतिहासाला नव्याने लिहिणार आहे.”

‘राजा शिवाजी’मधील तिची भूमिका पाहून अनेकांनी तिच्यावर कौतुकाचा, प्रेमाचा वर्षाव केला. त्याबद्दल दिशाने लिहिले, “या चित्रपटाच्या रूपात, या पात्राच्या रूपात प्रेम पुन्हा माझ्याकडे आलं. तुमचा प्रत्येक मेसेज, प्रत्येक शुभेच्छा मी मनापासून अनुभवते आहे. आज मी इथे उभी आहे ती फक्त एक अभिनेत्री म्हणून नाही, तर एक अशी व्यक्ती म्हणून जी खूपच भारावलेली, नम्र आणि मनापासून कृतज्ञ आहे.”

“अफजलची बेगम, कायम माझ्या हृदयाचा…”

शेवटी तिने लिहिले, “अफजलची बेगम, कायम माझ्या हृदयाचा एक भाग राहील.” तसेच तिने हार्ट इमोजी शेअर केली आहे. दिशाने राजा शिवाजी चित्रपटाच्या सेटवरील काही फोटो शेअर केले आहेत. काही फोटोंमध्ये तिचा मेकअप करत असल्याचे पाहायला मिळत आहे. एका फोटोत तिच्याबरोबर संजय दत्त दिसत आहेत, एका फोटोत रितेश देशमुख दिसत आहे.

दिशाच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. एकाने लिहिले, “तुझा अभिमान आहे”, दुसऱ्या एकाने लिहिले, “खूप सुंदर”, एकाने लिहिले, “तू खूप चांगलं काम केलं आहेस”, एकाने लिहिले, “तुझा परफॉर्मन्स पाहिला, प्रत्येक फ्रेममध्ये तू उत्तम दिसत आहेस, तू उत्तम अभिनय केला आहेस”, आणखी एकाने लिहिले, “चित्रपट छान आहे”, अशा अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहेत; तर अनेकांनी हार्ट इमोजी शेअर केल्या आहेत.

दरम्यान, अभिनेत्री आता आगामी काळात कोणत्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.