अभिनेत्री स्नेहल तरडे(Snehal Tarde) यांनी ‘फुलवंती’ या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनात क्षेत्रात पहिले पाऊल टाकले आहे. या चित्रपटात त्यांनी अभिनयदेखील केला आहे. मात्र, सध्या त्या एका मुलाखतीत केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आल्या आहेत. लोकप्रिय अभिनेते व दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्या त्या पत्नी आहेत. त्यांच्या लग्नावेळी प्रवीण तरडेंकडे कोणती गोष्ट त्यांनी मागितली होती, याबाबत त्यांनी वक्तव्य केले आहे.
लग्नात प्रवीण तरडेंकडे स्नेहल तरडेंनी मागितलेली ‘ही’ गोष्ट
स्नेहल तरडे यांनी नुकतीच ‘आरपार’ या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांना विचारण्यात आले की, तुम्ही शुद्ध शाकाहरी आहात का? त्यावर बोलताना त्यांनी म्हटले, “हो मी पूर्णपणे शाकाहारी आहे आणि प्रवीण मांसाहारी आहे. आम्ही ज्यावेळी लग्न करायचं ठरवलं त्यावेळी माझं त्याच्याकडे एकच मागणं होतं. मी फार प्रेमात होते त्याच्या. मी हेही नाही पाहिलं की, तो किती पैसे कमवतोय? आमचं भविष्य काय असणार आहे? एकच गोष्ट मी त्याच्याकडे मागितली. मी त्याला म्हटलं की, आयुष्यात तू कधीही मला नॉन व्हेज खायला लावायचं नाही. मला त्याला हातही लावायला लावायचं नाही.”
स्नेहल पुढे म्हणाल्या, “मी हात लावू शकत नाही म्हणजे माझी अशी धारणा अशी आहे की, देवानं माझ्यावर तशी वेळ आणलेली नाही की, एखाद्या जीवाला जीवे मारून मी माझं पोट भरेन .ही माझी स्वत:ची धारणा आहे. देव ना करो, अशी कधी वेळ आली, तर मला ते नाइलाजानं खावं लागेल. पण आता अशी वेळ देवानं माझ्यावर आणलेली नाही. तेव्हा मला कधी त्याला हात लावायला लावू नको किंवा मला तुझ्यासाठी करायला लावू नकोस.”
मग तुम्ही घरी करीत नाही का मांसाहार? त्यावर स्नेहल तरडेंनी म्हटले, “मुळीच नाही. प्रवीण ऑफिसमध्ये करतो. घरी त्याला नॉन व्हेज करायला परवानगी नाही.” दरम्यान, स्नेहल तरडेंनी दिग्दर्शित केलेल्या ‘फुलवंती’ चित्रपटात प्राजक्ता माळी आणि गश्मीर महाजनी प्रमुख भूमिकांत आहेत. या चित्रपटाचे सर्व स्तरातून कौतुक होताना दिसत आहे. ११ ऑक्टोबर २०२४ ला हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. प्राजक्ता आणि गश्मीर यांच्याबरोबर प्रसाद ओक, वैभव मांगले, समीर चौगुले असे अनेक कलाकार अभिनय करताना दिसले आहेत.