Gashmeer Mahajani Rakhandar movie team Ganpati Bappa visit : मराठमोळा अभिनेता गश्मीर महाजनीने मोठ्या उत्साहात गणरायाला घरी आणले. त्याने सुंदर इको-फ्रेंडली सजावटीमध्ये गणपती विराजमान केला. यावेळी महाजनींच्या घरी बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी गश्मीरच्या आगामी ‘राखणदार’ सिनेमाची टीम आल्याचे दिसून आले. सई ताम्हणकर, हेमांगी कवी, सुव्रत जोशी यांच्याबरोबर पूजा सावंतने पतीसह गणपती बाप्पाचे दर्शन घेतले.

गश्मीर महाजनीचा मुलगा व्योमनेसुद्धा वडिलांबरोबर अतिशय श्रद्धेने गणरायाची पूजा केली. यावेळी पूर्ण महाजनी कुटुंब एकत्र असल्याचे दिसून आले. गश्मीर महाजनीने घरात गणपतीसाठी केलेल्या सजावटीतून वारली संस्कृतीचे दर्शन घडवले. त्या सजावटीत वारली कलाकुसरीचे चित्र रेखाटण्यात आले असून, मागे विठ्ठल-रुक्मिणीची जोडी दर्शनासाठी उभी आहे, असे दिसून येते.

पूजा सावंतने पतीसह केली आरती

महाजनी कुटुंबाच्या घरातील गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी सेलिब्रिटींची मांदियाळी उपस्थित राहिल्याचे दिसून आले. ‘राखणदार’ या सिनेमाची पूर्ण टीम तेथे दर्शनासाठी आली होती. यावेळी अभिनेत्री सई ताम्हणकर, हेमांगी कवी व पूजा सावंत यांनी मनोभावे गणरायाची आरती केल्याचे दिसून आले. तसेच पूजाबरोबर तिचा पती सिद्धेश चव्हाणनेसुद्धा महाजनी कुटुंबाच्या गणपतीचे दर्शन घेतले. पूजा व सिद्धेशने जोडीने गणपती बाप्पाची आरती केली.

गश्मीर महाजनीच्या घरी ‘राखणदार’ची टीम

त्याचबरोबर अभिनेता सुव्रत जोशी आणि ‘राखणदार’ या सिनेमाच्या टीममधील काही जण गश्मीर महाजनीच्या घरी आले होते. गश्मीर महाजनीने कुटुंब व सिनेमाच्या टीमसह एकत्र उत्साहात गणपती बाप्पाचे स्वागत केले आणि इन्स्टाग्रामवर त्याबाबतचा व्हिडीओ शेअर केला आहे. यावेळी नेटकऱ्यांनी गश्मीरच्या आगामी सिनेमासाठी शुभेच्छा दिल्या असून, गणरायाच्या पारंपरिक व आकर्षक सजावटीचे कौतुक केले.

    नेटकऱ्यांनी केले कौतुक

    एका नेटकऱ्याने लिहिले, “महाजनी कुटुंबावर गणपती बाप्पांची अशीच कृपा राहू दे,” तर आणखी एका नेटकऱ्याने लिहिले, “खूपच सुंदर अशी पोस्ट आहे. गश्मीर व त्याचा मुलगा व्योमने परिधान केलेले कपडे साजेसे आहेत.” आणखी एका नेटकऱ्याने लिहिले, “गणपती बाप्पा तुझ्या मार्गातील सर्व विघ्नं दूर करो आणि तुला खूप आशीर्वाद देवो.”