Gashmeer Mahajani on Rakhandar Movie: गश्मीर महाजनी लवकरच ‘राखणदार’ सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. काही दिवसांपूर्वी त्याने या सिनेमाचे पोस्टर शेअर करीत त्याच्या नवीन सिनेमाची घोषणा केली होती. सिनेमात त्याच्याबरोबर अभिनेत्री सई ताम्हणकर प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. तसेच, या सिनेमात प्रमुख भूमिका साकारण्याबरोबरच तो सिनेमाचे दिग्दर्शनही करणार आहे.

आता चाहत्यांना गश्मीरच्या नवीन सिनेमाबद्दल अधिक जाणून घेण्याची उत्सुकता आहे. नुकताच गश्मीरने सोशल मीडियावर आस्क गश हे प्रश्नोत्तरांचा सत्र घेतले. यावेळी चाहत्यांनी त्याला सिनेमाबद्दल अनेक प्रश्न विचारले. गश्मीरनेही चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली.

गश्मीर महाजनी ‘राखणदार’ सिनेमाबद्दल काय म्हणाला?

एकाने विचारले की, राखणदार सिनेमा अॅक्शन थ्रिलर असणार आहे का? सिनेमाबद्दल तुम्ही आम्हाला आणखी काय सांगू शकता? त्यावर गश्मीर म्हणाला, “टीझरची वाट पाहूया. हा सिनेमाच्या माझ्या हृदयाच्या जवळचा आहे.” दुसऱ्या एका चाहत्याने विचारे की, ‘राखणदार’मध्ये गश्मीरशिवाय वेगळं काय असणार आहे? त्यावर अभिनेता म्हणाला, “ही गोष्ट वैयक्तिक आहे.” एका मल्याळी चाहत्याने विचारले की, ‘राखणदार’चा अर्थ काय आहे? त्यावर गश्मीरने ‘प्रोटेक्टर’, असे उत्तर दिले.

एकाने विचारले की, सिनेमात प्रमुख भूमिकेत कोणती अभिनेत्री असणार आहे? या प्रश्नाचे उत्तर देत गश्मीर म्हणाला, “सई ताम्हणकर”. एकाने विचारले की, अभिनय आणि दिग्दर्शन या दोन्हीपैकी कोणते काम जास्त इंटरेस्टिंग आहे? त्यावर अभिनेता म्हणाला, “दोन्ही एकाच नाण्याचा बाजू आहेत.” तुम्ही इतके सुंदर कसे आहात? यावर अभिनेत्याने सांगितले, “मी माझ्या वडिलांच्या अर्ध्या पटीने तरी सुंदर असायला पाहिजे होतो.”

एका चाहत्याने विचारले की, ‘राखणदार’ सिनेमाची प्रदर्शित होण्याची तारीख काय आहे? त्यावर गश्मीरने तारीख सांगितली नाही; पण सिनेमा २०२७ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे स्पष्ट केले. एक चाहता म्हणाला की सर माझी इच्छा आहे की, तुम्ही ‘मुंबईचा फौजदार २’ हा सिनेमा आताच्या पिढीप्रमाणे दाखवा. त्यावर गश्मीरने लिहिले, “करणार ना भावा. आधी ‘राखणदार’ बघ, मग पुढचा सिनेमा तोच करूयात. एक चाहता म्हणाला की, ‘राखणदार’ सिनेमा पाहण्यासाठी खूप उत्सुक आहे. त्यावर अभिनेता म्हणाला, “मीसुद्धा या सिनेमासाठी उत्सुक आहे. २०२७ मध्ये वादळ येणार.”

दरम्यान, गश्मीर सध्या सिनेमाच्या कामात व्यग्र असला तरी सध्या तो १०८ बेस हॉस्पिटल-उरी या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. सध्या या मालिकेचे प्रेक्षक कौतुक करीत असल्याचे दिसत आहे.