Gashmeer Mahajani Jagadambe Song : गश्मीर महाजनी मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. चित्रपट, सीरिज अशा माध्यमांमध्ये त्याने काम केलं आहे. अभिनयासह त्याला नृत्याचीही आवड आहे. अशातच आता पूजा सावंतच्या आगामी चित्रपटातील एका गाण्यात तो झळकला आहे. याबद्दल त्याने नुकतीच प्रतिक्रिया दिली आहे.
गश्मीर महाजनीने आतापर्यंत विविध चित्रपटांतून विविध भूमिका साकारल्या आहेत. त्याच्या काही भूमिका प्रेक्षकांना खूप आवडल्याही आहेत. पण, आता मात्र पहिल्यांदाच अभिनेता एका चित्रपटातील पारंपरिक गाण्यात झळकणार आहे. पूजा सावंतची मुख्य भूमिका असलेल्या ‘सालबर्डी’ या आगामी चित्रपटातील ‘जगदंबे’ या गाण्यावर तो पारंपरिक पद्धतीचं नृत्य करताना दिसत आहे. नुकतंच हे गाणं प्रदर्शित झालं आहे. यामध्ये भाळी भंडारा, गळ्यात कवड्याची माळ, हातात गुलाल आणि पारंपरिक वस्त्र परिधान केलेला असा लूक पाहायला मिळत आहे.
पूजा गश्मीरबद्दल काय म्हणाली?
गश्मीरने या गाण्यासाठी तीन आठवडे तालीम केली आहे, असं पूजाने ‘लोकमत फिल्मी’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे. गश्मीरबद्दल पूजा म्हणाली, “या चित्रपटात आम्ही एकत्र झळकणार नाही आहोत, पण गश्मीरने यातील एक गाणं केलं आहे. यापूर्वी आम्ही ‘बोनस’मध्ये एकत्र काम केलेलं, तेव्हापासून आमची मैत्री घट्ट झाली आहे. तो माझा हक्काचा मित्र आहे. गश्मीरने खूप छान नृत्य केलं आहे. अजय गोगावले सरांनी ते गायलं आहे. आशीष पाटीलने कोरिओग्राफी केली आहे.”
गश्मीरबद्दल पूजा पुढे म्हणाली, “मला असं वाटतं, देवीनेच गश्मीरकडून ते करून घेतलंय. खऱ्या मंदिरात ते गाणं शूट झालं आहे. देवी ती सेवा ह्याच्याकडून करून घेत होती. त्याने तीन आठवडे तालीम केल्यानंतर एका दिवसात पूर्ण गाणं शूट केलं आहे.”
गश्मीर महाजनी नेमकं काय म्हणाला?
चित्रपटातील गाण्याबद्दल गश्मीर पुढे म्हणाला, “तीन आठवडे यासाठी लागले, कारण लोककला सादर करताना खूप मेहनत घ्यावी लागते. बारीक गोष्टींकडे लक्ष द्यावं लागतं. मी असा अभिनेता आहे, ज्याला नृत्य करता येतं पण मी नर्तक नाहीये; म्हणून मला वेळ घ्यावा लागला.” पुढे ‘सालबर्डी’ हा सिनेमा देव, धर्म, श्रद्धा, अंधश्रद्धा याभोवती फिरतो; तुझा यावर किती विश्वास आहे असं विचारल्यानंतर तो म्हणाला, “आपला धर्म श्रद्धेबद्दल जे काही सांगतो ते सगळं मी मानतो. मी आस्तिक आहे. अंधश्रद्धा जिथे येते ते खटकतं फक्त, पण मी श्रद्धाळू आहे; माझा देवावर, आपल्या धर्मावर, संस्कृतीवर विश्वास आहे, मी काही गोष्टी पाळतो.”
