Gashmeer Mahajani upcoming movie: गश्मीर महाजनी गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. दोन दिवसांपूर्वी त्याने एक फोटो पोस्ट शेअर केला होता.??? या फोटोवर त्याने “माझा आवडता प्राणी-माझे बाबा” असे लिहिले होते. त्यानंतर त्याच्या या पोस्टची मोठी चर्चा झाली होती. हा त्याचा आगामी सिनेमा असल्याचा अंदाज अनेकांनी व्यक्त केला होता. मात्र, गश्मीरने त्याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती दिली नव्हती.
आता गश्मीर महाजनीने पुन्हा एकदा सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याने पुन्हा तसाच फोटो शेअर केला आहे. मात्र, याआधीच्या पोस्टमध्ये पाठमोरी व्यक्ती पाहायला मिळत होती. आता शेअर केलेल्या या पोस्टमध्ये व्यक्तीचा चेहरा समोर असल्याचे दिसत आहे. मात्र, त्याच्या चेहऱ्यावर मास्क आहे. सिंहाचे तोंड असल्याचे दिसत आहे.
“माझा आवडता प्राणी- माझे बाबा”
ही पोस्ट शेअर करताना गश्मीर महाजनीने “माझा आवडता प्राणी- माझे बाबा”, असे लिहिले आहे. तसेच, चित्रपटाच्या नावाचा खुलासा केला आहे. ‘राखणदार’ असे सिनेमाचे नाव आहे. हा सिनेमा २०२७ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन गश्मीर महाजनी करणार आहे, तर निर्मिती पंचतंत्र फिल्म्स प्रायव्हेट लिमिटेड करणार आहे.
सिनेमात गश्मीर महाजनी प्रमुख भूमिकेत दिसणार आहे, तर त्याच्याबरोबर सई ताम्हणकर, मकरंद अनासपुरे हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. गश्मीरच्या या पोस्टवर नेटकरी भरभरून कमेंट्स करत आहेत. एकाने हार्ट इमोजी शेअर करत लिहिले, “सई व गश्मीर”, दुसऱ्या एकाने लिहिले, “गश्मीर तू माझ्या भावना व आतुरता समजू शकत नाहीस”, एकाने लिहिले, “या नवीन प्रवासासाठी खूप शुभेच्छा”, आणखी एकाने लिहिले, “गश्मीर सर कधीच निराश करत नाहीत.” एकाने लिहिले, “हे खूप अप्रतिम दिसतंय, पाहण्यासाठी खूप उत्सुक आहे”, अशा अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहेत.
गश्मीरने याआधी विविध भूमिकांतून, सिनेमांतून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. त्याला अभिनेता म्हणून मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळाली. आता तो या सिनेमातून दिग्दर्शनात पदार्पण करत आहे. त्यासाठी त्याला अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत. आता या सिनेमात आणखी कोणते कलाकार दिसणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
दरम्यान, गश्मीर महाजनी लवकरच ‘१०८ बेस हॉस्पिटल उरी’ या मालिकेत दिसणार आहे.
