Gashmeer Mahajani talks about his son : गश्मीर महाजनी मराठी व हिंदी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेता आहे. त्याने आतापर्यंत अनेक चित्रपट, मालिका आणि रिअॅलिटी शोमध्ये काम केलं आहे. त्याने त्याच्या अभिनयाने आतापर्यंत अनेकांची मनं जिंकली आहे. अभिनयासह गश्मीर त्याच्या मनमोकळ्या स्वभावासाठीही ओळखला जातो. तो अनेकदा त्याची विविध गोष्टींबद्दलची मतं, प्रतिक्रिया व्यक्त करत असतो.

गश्मीर महाजनी त्याच्या व्यावसायिक आयुष्यासह काहीवेळा खासगी आयुष्यामुळेही चर्चेत असतो. परंतु, अभिनेत्याचं कुटुंब त्याचा मुलगा व्योम आणि बायको गौरी देशमुख लाईमलाईटपासून दूर असतात. अशातच आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्याने त्याच्या मुलाबद्दल त्याच्या शाळेबद्दल आणि त्याच्या जडनघडन याबद्दल सांगितलं आहे.

गश्मीरने यावेळी त्याचा मुलगा ज्या शाळेत जातो तिथे त्याला घरुन डब्बा घेऊन जावा लागत नाही असं म्हटलं आहे तर त्याच्या शाळेत एक खास आणि वेगळा नियम असल्याचं सांगितलं आहे. शिवाय मुलासमोर तो किंवा त्याच्या घरातील सदस्य टीव्ही पाहत नाही असंही सांगितलं आहे. अभिनेता लेकाबद्दल नेमकं काय म्हणाला जाणून घेऊयात…

इतर शाळांपेक्षा वेगळी आहे गश्मीरच्या मुलाची शाळा

‘लोकमत फिल्मी’ला दिलेल्या मुलाखतीत गश्मीर म्हणाला, “त्याची जी शाळा आहे तिथे त्याला डब्बा घेऊन जावा लागत नाही. शाळेतच जेवणाची सोय असते आणि दर महिन्यातून एक दिवस प्रत्येक मुलाच्या घरातून पाठवायचं असतं. त्यामुळे बाहेरचं जेवण नसतं. त्यामुळेच दररोज कुठल्या न कुठल्या मुलाच्या घरातून ३० मुलांसाठी जेवण जातं. मग ती मुलं त्यांच्या हाताने वाढून घेतात. जेवून झालं की ताट वगैरे सगळं स्वच्छ करुन पुन्हा ठेवतात आणि संपूर्ण आहार लागतो. पोळी,भाजी, आमटी, बात, सलाड वगैरे सगळं असतं”.

गश्मीर पुढे लहानपणी जेवण न केल्यामुळे आईच्या हातचा कधी मार पडलाय का असं विचारल्यानंतर तो म्हणाला, “नाही. माझ्याबरोबर असं कधीच झालं नाही आणि व्योमलाही तसं काहीच करावं लागत नाही. आम्ही फक्त जेवणाच्या वेळा कधीच चुकवत नाही. पण जर वेळ चुकली तर मग तो थोडे नखरे करतो. सेटवर नसेन तर संध्याकाळी साडे सात पावने आठला जेवतो. दुपारचं जेवण साडे बारा किंवा एक वाजता होतं.”

गश्मीरने मुलासाठी घेतलेत महत्त्वाचे निर्णय

गश्मीरला तो सात वाजता जेवल्यानंतर झोपतो कधी असं विचारल्यानंतर तो म्हणाला, “मी थोडा उशीरा झोपतो. कारण – मी वाचन करत असतो, टीव्हीवर काहीतरी पाहत असतो. कारण मी जे टीव्हीवर पाहतो तो ते पाहू शकत नाही. त्यामुळे तो असताना आम्ही कोणीच टीव्ही पाहत नाही. त्यामुळे मला जर काही पाहायचं असेल किंवा वाचायचं असेल तर तो झोपल्यानंतर पाहतो. तो आठ पर्यंत झोपतो. सकाळी तो साडे सहा पावने सात वाजता उठतो. आठ वाजतो शाळेत जातो.”